भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3/4 वर संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या एका तरुणीला आरपीएफ जवानांनी ऑपरेशन ‘डीग्निटी’ अंतर्गत सुरक्षित रेस्क्यू केले. स्थानकावर ड्युटीवर असलेल्या आरक्षक नितीन पाटील यांना ही तरुणी संभ्रमित अवस्थेत फिरताना दिसली. चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तिला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तेथे एएसआय दीपक कव्हले यांनी सीसीटीव्ही निरीक्षणाखाली चौकशी केली.
चौकशीत शिवानी उमेश पांडेय (वय 18, रा. हरदोई, उत्तर प्रदेश)असे तिचे नाव असून, ती दि. 4 फेब्रुवारी रोजी घरातून कोणालाही न सांगता नाराज होऊन मुंबईला निघाली होती परंतु नंतर पश्चात्ताप झाल्याने भुसावळ स्थानकात उतरली असल्याचे सांगितले. या संदर्भात तिचे वडिल उमेश पांडेय यांना कळवण्यात आले. त्यानंतर तिला भुसावळ ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर तिला सखी वन स्टॉप सेंटर जळगाव येथे सुरक्षित दाखल करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी ऑपरेशन ‘डीग्निटी’ अंतर्गत तत्काळ कारवाई करत तिच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आणि योग्य मार्गदर्शन केले.