… तरच मी राजीनामा देईन !

कृषीमंत्री कोकाटेंची माहिती : मला रमी समजतच नाही

0

नाशिक : सभागृहातील माझी व्हायरल झालेला व्हिडीओ रमी खळतांना सिद्ध झाले तर मी लागलीच पदाचा राजीमाना देर्इल; मला रमी खेळताच येत नसल्याने मी हे उद्योग कशासाठी करणार असा प्रश्न उपस्थित करीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांची हवा गुल करण्याचा प्रयत्न केला आहे. ते आज सकाळी माध्यमांशी बोलत होते.
विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादात सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. कारण माणिकराव कोकाटे यांनी आज दि. 22 जुलै रोजी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा केली. माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी या नव्या योजनेचे लाँचिंग करत असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.
मी खरे म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहिती नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहिती नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या ॲप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला.

त्या क्षणाला राजीनामा
मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझे काम होते. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यांना सभागृहात आत येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. 30 सेकंद गेम स्कीप करता येत नाही. माझा व्हिडिओ 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते. मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे, याप्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावे, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.