जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. ऑनलाईन जॉबची ऑफर देऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राहुल कृष्णा चौधरी (वय २६) या तरुणाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख ७२ हजार रूपयांचा चुना घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ठगबाजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत वास्तव्यास असणारे राहुल कृष्णा चौधरी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांना ७ ऑक्टोबरला टेलिग्रामवर एक मेसेज आला. त्यावर रमा लक्ष्मी नावाच्या व्यक्तीने मी प्राइस रनर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून चांगल्या कमाईचे ऑनलाइन जॉब पाहिजे असल्यास संपर्क साधण्याचे सांगितले. या मेसेजकडे राहुलने दुर्लक्ष केले. मात्र ११ ऑक्टोबरला पुन्हा त्याला हा मेसेज पाठविण्यात आला. यात जॉबवर ऑफर असून आठ हजारातच कामाला सुरूवात करता येईल, असे आमिष देत दिले त्यानंतर राहुलने ऑनलाइन पैसे भरले.
दरम्यान यानंतर दुसरी योजना सांगत नव्या सापळ्यात ओढले. यात लक्झरी प्रोडक्ट मिळाले असून ते मिळविण्यासाठी १५ हजार रूपये भरावयास सांगितले. ही रक्क्म देखील त्यांनी भरल्यानंतर ठगांनी राहुल यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ९ हजार ८०० रूपये त्यांच्या खात्यावर पाठविले. नंतर १९ ऑक्टोबरला पुन्हा मेसेज पाठवत आमच्या वेबसाइटवर तुमच्यासाठी आणखी ऑफर आहे. म्हणून ३० हजार रूपये भरावे लागतील असे सांगितल्यावर राहुल याने पुन्हा ३० हजार रूपये भरून ऑनलाइन कामाला सुरूवात केली. असे करत वेळोवेळी एकूण ४ लाख ७२ हजार रूपयांची रक्कम राहुल याने पाठविली.
ती रक्कम काढण्यासाठी त्यांच्याकडे अडीच लाख रूपयांची मागणी केल्याने फसवणूक झाल्याचे राहुलच्या लक्षात आले. यामुळे त्याने पैसे परत मागितले असता समोरच्याने पैसे परत न केल्याने चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.