जळगावातील महिलेची ऑनलाईन फसवणूक; परराज्यातून आरोपी जेरबंद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील गजानन कॉलनी येथील महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कॉंग्रेस नारायण कुढेही (वय २६, रा. पंडापदर, ता.रामपुर जि.कालाहंडी, ओरिसा) या संशयित आरोपीला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याला शुक्रवार १८ मार्च रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरातील गजानन कॉलनीतील रहिवासी अनुपमा प्रभात चौधरी यांना केवायसी करण्याविषयी अनोळखी इसमाचा फोन आला होता. यावेळी संबंधिताने एक लिंक मोबाइलवर पाठवली. तसेच ओटीपी क्रमांक मिळून अनुपमा चौधरी यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने दहा हजार रुपये काढुन घेतले होते. याप्रकरणी अनुपमा चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत संशयित निष्पन्न केला. या तपासणीत संशयित हा ओरिसा राज्यातील असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक रामदास वाकुडे यांनी संशयितांच्या शोधार्थ हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील, पोलिस नाईक सलीम तडवी, पोलिस कॉन्स्टेबल विकास पहुलकर यांचे पथक ओरिसा राज्यात रवाना केले.

सदर संशयित ज्या भागात राहत होता तो भाग नक्षलवादी होता. दरम्यान संशय येऊ नये म्हणून तपास करणाऱ्या पथकातील कर्मचार्‍यांनी तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांप्रमाणेच पेहराव केला. तपासाची चक्रे फिरवत संशयित काँग्रेस कुढेही याला अटक करून त्याला गुरुवारी जळगावात आणण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.