शिक्षिकेची १ लाख ३० हजारात ऑनलाईन फसवणूक

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पार्सल ऍक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून पाचोरा शहरातील एका महिलेची १ लाख ३० हजार ३१९ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा शहरातील शांती नगरात सुवर्णा लक्ष्मण काळे (वय ४३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. भातखंडे ता. भडगाव येथील शाळेत शिक्षिका पदावर नोकरी करून ते आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतात. सुवर्णा काळे यांची पचनक्रिया सुरळीत नसल्याने त्या पुणे येथील डॉ. निलेश लोंढे यांचेकडे आयुर्वेदिक औषधोपचार घेत होत्या. त्याच संदर्भात लागणाऱ्या औषधी सुवर्णा काळे यांनी ऑनलाईन मागविल्या होत्या.

२८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे मोबाईल क्रमांकावर https://actpe.in या लिंकवरुन मॅसेज आला की, तुमचे पार्सल डिअॅक्टीव्हेट झाले आहे. ते अॅक्टीव्ह करण्यासाठी लिंकवर ५ रुपये पाठवावे असे निर्देषीत करण्यात आले. त्यानुसार सुवर्णा काळे यांनी लिंकवर जाऊन ५ रुपये पाठवले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बॅंक खात्यातुन १९९ रुपये, दि. २९ जानेवारी ८६ हजार ५५५ रुपये, १२ हजार ५५५ रूपये, ८०० रूपये, व दि. ३० जानेवारी रोजी १ रुपया, ८ हजार ९९९ रूपये, ११ हजार १११ रूपये, ८ हजार ८९४ रूपये, १ हजार २०० रूपये असे एकूण १ लाख ३० हजार ३१९ रुपये परस्पर कमी झाले.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे सुवर्णा काळे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी नंबर धारकावर पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.