महिलादिनी महिलेवरील हल्ल्याने लागले गालबोट !

0

 

लोकशाही संपादकीय लेख

शनिवार दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा झाला. महिला दिनानिमित्त महिलांनी केलेल्या आणि करीत असलेल्या अनेक विक्रमाबाबतची चर्चा करून स्तुती सुमने वाहिली गेली . पुरुषांप्रमाणेच महिला सुद्धा सर्वच क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. महिलांसाठी चूल आणि मूल हा जो शिका लागला होता तो विद्यमान महिलांनी पुसून टाकला आहे. पुरुषांप्रमाणेच महिलां सुद्धा शिक्षणात आघाडी घेत आहेत. किंबहुना शिक्षणात महिलांची पुरुषांपेक्षा जास्तची आघाडी आढळून येते. शिक्षणाच्या माध्यमातून महिला सुद्धा डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्रशासन आदी क्षेत्रांमध्ये बाजी मारत आहेत. राजकारणात सुद्धा महिलांची चांगली कामगिरी दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 50 टक्के आरक्षण महिलांना देण्यात आले आहे. त्यामुळे राजकारणात सुद्धा पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर आदी पदे उत्कृष्टपणे त्या सांभाळत आहेत. निर्णय क्षमतेत सुद्धा महिलांचा सहभाग वाढला आहे. तथापि पुरुषी अहंकार महिलांसाठीच्या सुरक्षेसाठी म्हणा अथवा त्यांच्यावर पुरुषी वर्चस्व असले पाहिजे म्हणून महिलांवर दबाव टाकला जात आहे. म्हणजे महिलांच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या घटना पहिल्या अथवा महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना वाढल्या असे दिसले की महिलांवर पुरुष वर्चस्व जागवण्याचा प्रयत्न करत आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या पाडळसे येथील चेतन वासुदेव कोळी या तरुणाचा 18 वर्षीय उल्हासनगर येथील वैष्णवी तायडे हिच्याशी प्रेम विवाह झाला होता. वैष्णवी ही आपल्या मामाकडे लहानपणापासून वास्तव्यास होती. तिने प्रेमविवाह केला म्हणून मामाने रागाच्या भरात केळी कापण्याच्या विळ्याने तिच्यावर पिंपरी येथे जाऊन हल्ला करून तिला जबर जखमी केले. त्यात वैष्णवी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात वैष्णवीची पिंपरी येथील नणंद ही सुद्धा जखमी झाली आहे. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैष्णवीचा दोष काय? तर तिने प्रेमविवाह केला. प्रेमविवाह करण्याचा तिला अधिकार नाही का? पुरुषाने प्रेमविवाह केला तर चालतो पण महिलांनी करता कामा नये, हा पुरुषी अहंकार नाही का? बरे ज्या दिवशी महिला दिन साजरा होत होता, महिलांची गुणगान गायले जात होते, त्याच दिवशी जर महिलेने प्रेम विवाह केला म्हणून तिच्यावर हल्ला होतो, तर हा महिलांवर पुरुषांकडून होणारा अन्याय नाही का? महिलांवर विविध कारणाने त्यांचे पुरुषांचा दबाव येतो या अन्यायाला काय म्हणावे?

 

भारतात पुरुष महिलांची संख्या जवळ जवळ सारखी आहे. निम्मे पुरुष निम्म्या स्त्रिया असताना पुरुषांप्रमाणेच महिला सर्व क्षेत्रात सक्षम असताना महिलांवर दबाव तंत्राचा वापर होतोय. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. अन्यथा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा या पुरुषांना अधिकारच नाही. राजकारणात महिलांना आरक्षण दिले गेले असले तरी राजकारणात पदार्पण करणाऱ्या महिलांवर त्यांचे पतीचेच वर्चस्व चालते. राजकारणातील भ्रष्टाचार कमी व्हावा असे वाटत असेल तर महिलांना राजकारणात स्वतंत्रपणे काम करण्याची संधी दिली पाहिजे. परंतु पुरुषी अहंकार महिलांना राजकारण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देत नाही. त्यामुळे महिलांच्या स्वातंत्र्यात पुरुषांकडून जर गदा येत असेल तर असा पुरुषी अहंकार काय कामाचा? अनेक वेळा राजकारणात पत्नी सरपंच असेल तर तिचा पतीत सरपंच पदाची भूमिका पार पाडतो. तोच प्रकार पंचायत समिती सभापती असलेल्या पत्नीची भूमिका तिचा पती पार पाडताना दिसून येतो, हे विशेष आहे. त्यामुळे महिलादिन साजरा करताना या पुरुषी अहंकाराबरोबरच वेगळा विचार होण्याची गरज आहे. तरीसुद्धा भारतात पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशाचे पंतप्रधानपद उत्कृष्टपणे सांभाळले. भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राच्या सुपुत्र प्रतिपाताई पाटील यांनी पाच वर्षे राष्ट्रपती पदाची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली आहे. विद्यमान राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू या सुद्धा आदिवासी समाजातील महिला असूनही राष्ट्रपतीपद भूषवित आहेत. त्यामुळे महिलांमध्ये क्षमता नाही असे म्हणता येणार नाही. त्यामुळे महिला दिन साजरा करताना महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महिलांवर अन्याय अत्याचार करून महिला दिनाला गालबोट लावणाऱ्या पुरुषांना धडा शिकवण्याची गरज आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.