लोकशाही संपादकीय लेख

माजी मंत्री लोकसेवक बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी यांची आज 98 वी जयंती. या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यायचा म्हटला म्हणजे, त्यांच्या अनेक कार्याच्या स्मृती जागृत होतात. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी अनेक वर्ष मंत्रिपद उपभोगले. मंत्रीपदानंतर पाच वर्ष ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. आपल्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी अनेक विकासाची कामे केली. असा विकास केला की सर्व पायाभूत विकास कामे त्यात येतात. त्यातील किती म्हणून विकास कामांची यादी आपल्याला देता येईल. वरणगाव तसेच भुसावळ आयुध निर्माण फॅक्टरी त्यांच्याच काळात निर्माण होऊन शुभारंभ केला गेला. दीपनगरचे ऊर्जा केंद्र त्यांनीच उभे केले आहे. सहकार क्षेत्रात नेत्रदीपक असा विकास त्यांनी केला आहे. यावल येथील मधुकर सहकारी साखर कारखाना चाळीसगाव येथील बेलगंगा सहकारी साखर कारखाना, एरंडोल येथील वसंत सहकारी साखर कारखाना ही त्यांचीच देणगी आहे. साखर कारखान्यांमुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला. त्यामुळे तेथे समृद्धी आली. तशी समृद्धी आपल्या भागात आली पाहिजे ही त्यांची मनीषा होती. हे साखर कारखाने त्यांनी सुरू केले, ते भरभराटीसही आले. पण पुढच्या पिढीकडून ते चालवले जाऊ शकले नाही, म्हणून ते डबघाईसं आले. त्यामुळे सहकार क्षेत्रातील साखर कारखाने आज आजारी पडल्यासारखे झाले असून साखर कारखान्याचे क्षेत्र मोडीत निघाले आहे. सहकार क्षेत्रात सूतगिरण्या आणल्या त्या बाळासाहेबांनीच. दोन्ही सूतगिरण्या या त्यांचीच देण आहे. आज या दोन्ही सूतगिरण्या पुढच्या पिढीला चालवणे शक्य नसल्यामुळे त्या मोडीत निघाल्या. ‘सहकारातून समृद्धी व्हावी’ म्हणून बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी सूत गिरण्या आणल्या पण त्याही सूतगिरण्या पुढे चालवता आल्या नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. जळगाव जिल्ह्यात सिंचनाचा विचार केला तर हातनुर धरण हे त्यांच्याच कालावधीत पूर्ण झाले, पण नंतर त्या धरणात निर्माण झालेल्या गाळामुळे धरणाची स्थिती वाईट झाली आहे. आताच्या पिढीला तो गाळ काढणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी होते आहे, एवढे मात्र निश्चित. हातनुर धरणामुळे सिंचनाबरोबरच त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, हेही तितकेच खरे आहे. आता या धरणांचे वाढीव दरवाजे काढण्याचा प्रस्ताव पेंडिंग आहे. वर्षानुवर्षे झाली त्या वाढीव दरवाजांचे काम होत नाही. त्यामुळे त्यांचा जो दुसरा कालवा आहे तो प्रलंबित पडला आहे. म्हणजे आताच्या पिढीकडून साधे वाढीव दरवाजे आणि डाव्या कालव्याचे काम होत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागते आहे. त्यांचे नंतर निघालेले सहकार क्षेत्रातील साखर कारखाने आणि सूत गिरण्यांची सुद्धा वाट लागली आहे. आज एक चोपडा साखर कारखाना वगळता सर्व साखर कारखाने बंद पडले आहेत. यावलची सूत गिरणी सुद्धा बंद पडली आहे. फक्त मुक्ताईनगर सूतगिरणी तेवढी चालू आहे. आता अशा प्रकारे सहकार क्षेत्र मोडीत निघाल्यामुळे ऊस उत्पादक तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे निराशेचे वातावरण पसरले आहे. सहकार क्षेत्राला दूध विकास प्रकल्प त्यांनी व जे टी महाजन यांनी आणला तोच आता कसाबसा चालू आहे. कॉटन पार्क भुसावळकरांचे की जामनेरचे हा वाद चालू आहे. त्याला मूर्त स्वरूप येईल तेव्हा येईल, पण मूर्त स्वरूप येण्याआधीच गाजावाजा फार होतो आहे, हे तितकेच खरे आहे. त्या व्यतिरिक्त तापी नदीवरील पुलाचे काम बाळासाहेब चौधरी यांचे कारकिर्दीत झाले आहे. जळगावचे आकाशवाणी केंद्र मधुकरराव चौधरी यांचीच देणगी आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ होण्यासाठी बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी प्रयत्न केले नसते तर ते आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले नसते. जळगाव जिल्ह्यात वाघूर धरणाला मंजुरी मिळाली पण पर्यावरणाच्या कचाट्यात ते बारा वर्षे अडकले होते. बारा वर्षानंतर एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर त्याची पर्यावरणातून सोडवणूक केली. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात शेळगाव बॅरेज असेल, मंगळूर धरण असेल, सुखी धरण असेल हे त्यांचेच कारकिर्दीत झालेले प्रकल्प आहेत..!
विकास कशाला म्हणतात हे बाळासाहेबांकडून शिकले पाहिजे. सर्व प्रकारची पायाभूत विकासाची कामे बाळासाहेब चौधरी यांनी केली. बाळासाहेब चौधरींना एकच ध्यास होता तो म्हणजे आपल्या भागाचा विकास कसा होईल! हा एकमेव ध्यास त्यांचा होता. आताच्या राजकारणातील मंडळींशी त्यांची तुलना करायची म्हटली तर ती त्यांना तसूभरही पुरणार नाहीत. 25 ते 30 वर्ष झाले पाडळसरे धरण प्रलंबित पडले आहे. निधी अभावी हे धरण प्रलंबित आहे. अनेक वर्ष लागलेल्या या धरणाची किंमत अव्वाच्या सव्वा वाढली आहे. उलट त्या भागातील शेतकरी आणि गावकरी हे पिण्याच्या पाण्याची चातकासारखी वाट पाहत आहेत. आता नदीजोड गिरणा प्रकल्प घोषित झाला. त्याला मंजुरी देखील मिळाली. दोन वर्षे या मंजुरीला लागले. पहिल्या टप्प्यात 4000 कोटी रुपयांचे काम तर दुसऱ्या टप्प्यात तीन हजार कोटी रुपयांचे काम होणार आहे. पाहूया काम किती गतीने होते ते… जर असेच रेंगाळत राहिले तर त्याला काही वर्ष लागतील आणि आमचा चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील शेतकरी सिंचनासाठी वाटच पहात राहील यात शंका नाही. त्यामुळे बाळासाहेब मधुकरराव चौधरी आणि आताच्या राजकारण्यांची तुलनाच होऊ शकत नाही. अश्या या बाळासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!


