लोकशाही संपादकीय लेख

आषाढ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील केवळ एक महिना नव्हे; तो श्रद्धेचा, समर्पणाचा आणि आशेचा महाउत्सव आहे. काळ्या मातीतून उगवणाऱ्या जीवनाचा आणि विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या विठ्ठलाशी जुळलेल्या अनादि नात्याचा हा पवित्र सोहळा. आषाढ सुरू झाला की महाराष्ट्राची प्रत्येक वाट पंढरीकडे वळते. टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांची मधुर लय, खांद्यावर भगवी पताका आणि ओठांवर ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड गजर या साऱ्यांतून भक्तीचे असे विश्व उभे राहते की, क्षणभर सारे दुःख, सारे भेद आणि साऱ्या चिंता विरघळून जातात. पंढरपूर केवळ एक तीर्थक्षेत्र राहत नाही; ते महाराष्ट्राच्या सामूहिक श्रद्धेचे धडधडते हृदय बनते.
परंतु यंदाचा आषाढ भक्तीचा जितका आहे, तितकाच तो चिंतेचाही आहे. आभाळाने वेळेवर कृपादृष्टी केली नाही. वरुणराजाच्या उशिरा झालेल्या आगमनाने शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाले. वेळेवर पेरणी करता आली नाही. जिथे हिरव्यागार अंकुरांनी डोलायला हवे होते, तिथे अजूनही कोरड्या मातीत आशेचे डोळे लागलेले दिसतात. शिवारातील शांतता मनाला चटका लावते. पावसाचा प्रत्येक दिवस उशिरा येतो, तेव्हा बळीराजाच्या मनातील चिंता आणखी गडद होत जाते. मात्र संकटे ही शेतकऱ्याला नवीन नाहीत. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, बाजारातील चढ-उतार आणि निसर्गाचे लहरी चक्र या साऱ्यांशी दोन हात करत तो आजवर उभा राहिला आहे. म्हणूनच यंदाही त्याने पराभव स्वीकारलेला नाही. उशिरा का होईना, पाऊस येईल या विश्वासाने त्याने पुन्हा नांगर हाती घेतला आहे. मातीशी नाते जोडणाऱ्या या माणसाच्या मनात निराशेपेक्षा आशेचेच बी अधिक खोल रुजलेले असते. कारण त्याला ठाऊक असते की, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट उगवते आणि प्रत्येक कोरड्या ऋतूनंतर हिरवाई परत येते.
याच काळात लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत आहेत. त्यांच्या पावलांत कष्ट आहेत, पण मनात आनंद आहे. त्यांच्या प्रवासात थकवा आहे, पण श्रद्धेचा झरा अखंड वाहत आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही; ती समता, बंधुता आणि माणुसकीचा जिवंत संदेश आहे. या वारीत राजा-रंक, श्रीमंत-गरीब, जात-पात, भाषा आणि प्रदेश यांचे सर्व भेद मागे पडतात. विठ्ठलाच्या चरणी प्रत्येकजण केवळ भक्त म्हणून उभा राहतो. हीच वारकरी संप्रदायाची खरी ताकद आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे चिरंतन वैभवही. विठ्ठल म्हणजे केवळ मंदिरातील काळी पाषाणमूर्ती नव्हे. तो भक्तांच्या विश्वासाचा श्वास आहे. शेतकऱ्याच्या घामातील तेज आहे. वारकऱ्याच्या पावलातील लय आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्याच्या चरणी विश्वरूप पाहिले, संत तुकारामांनी ज्याच्या नामात जीवनाचे सार शोधले आणि संत नामदेवांनी ज्याला आपल्या सख्यासारखे जपले, तो विठ्ठल आजही विटेवर उभा राहून भक्तांच्या आशा ऐकत आहे. त्याच्या शांत मुद्रेत संयमाचा संदेश आहे, तर कमरेवर ठेवलेल्या हातांत संघर्षाला सामोरे जाण्याचे बळ दडलेले आहे.
आज महाराष्ट्राची सर्वात मोठी प्रार्थना मोक्षासाठी नाही; ती समृद्धीसाठी आहे. काळ्या मातीत पुन्हा हिरव्या स्वप्नांचे अंकुर फुटावेत, शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य दाम मिळावा, नद्यांनी दुथडी भरून वाहावे, जलसाठे परिपूर्ण व्हावेत आणि प्रत्येक घरात समाधानाचे दिवे प्रज्वलित व्हावेत, हीच खरी विठ्ठल चरणी अर्पण केलेली प्रार्थना आहे. कारण शेती समृद्ध झाली, तरच गाव समृद्ध होईल; गाव समृद्ध झाले, तरच महाराष्ट्राची प्रगती खऱ्या अर्थाने घडेल. आषाढी वारी आपल्याला आणखी एक मोलाचा धडा शिकवते. पंढरीची वाट चालताना प्रत्येक वारकरी स्वतःचे दुःख विसरतो आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधतो. समाजात आज अशीच सामूहिक संवेदनशीलता आणि परस्पर सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या संकटाकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर कर्तव्यभावनेने पाहण्याची वेळ आली आहे. कारण अन्नदाता सक्षम असेल, तरच समाजाचे भविष्य सुरक्षित राहील.
बा, विठ्ठला आभाळाला कृपेची ओल दे, काळ्या मातीला अंकुरांचे हसू दे, बळीराजाच्या घामाला सोन्याचे मोल दे, प्रत्येक शिवारात हिरवाईचे अभंग फुलू दे, वारकऱ्यांच्या ओठांवरील नामघोषाप्रमाणे प्रत्येक घरात आनंदाचा स्वर घुमू दे, तुझ्या विटेवर उभ्या असलेल्या संयमाने आम्हालाही संकटांवर मात करण्याची शक्ती दे, महाराष्ट्राच्या प्रत्येक कणात समृद्धी, समाधान आणि माणुसकी नांदू दे… कारण तुझ्या दर्शनाचा खरा प्रसाद हा केवळ भक्ती नसून, सर्वांच्या जीवनात फुलणारी सुख-समृद्धीच आहे.


