लोकशाही न्यूज नेटवर्क
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शासनाची अंतिम मान्यता न घेता सुरू असलेल्या अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. संबंधित शाळांना शासनाचा यूनिक कोड ला प्राप्त नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यास कोणत्याही नवीन शाळेत प्रवेश देण्यापूर्वी त्या शाळेची अधिकृत मान्यता तपासावी. यासाठी पालिकेच्या शिक्षण विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
महापालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की, संबंधित शाळांनी शासनाने ठोठावलेला दंड न भरता शाळा सुरू ठेवल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच सध्या या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे इतर अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे.
अनधिकृत शाळांची जाहीर यादी
- सरिता एज्युकेशन ट्रस्टचे संकल्प इंग्लिश स्कूल – बल्याणी, टिटवाळा (इंग्रजी माध्यम)
- सनराईज इंग्लिश स्कूल – बल्याणी, टिटवाळा (इंग्रजी माध्यम)
- प्रगत शिक्षण संस्थेचे ईवा वर्ल्ड स्कूल – गौरीपाडा, आरटीओ ऑफिसजवळ, कल्याण (पश्चिम) (इंग्रजी माध्यम)
- प्रगत शिक्षण संस्थेचे क्रेस्टमॉड स्कूल – गौरीपाडा, योगोधाम, कल्याण (पश्चिम) (इंग्रजी माध्यम)
- अनुभव ट्रस्टचे सिंघानिया स्कूल, उंबर्डे – उंबर्डे गाव, कल्याण (पश्चिम) (इंग्रजी माध्यम)
- सी.पी. गोयंका स्कूल – दत्तनगर स्मशानभूमीजवळ, आयरे रोड, डोंबिवली (पूर्व) (इंग्रजी माध्यम)
- बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कूल – महाराष्ट्र नगर, डोंबिवली (पश्चिम) (इंग्रजी माध्यम)
महापालिकेने पुन्हा एकदा पालकांना आवाहन केले आहे की, प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. शाळेची शासनमान्यता, युडायस क्रमांक व आवश्यक कागदपत्रे तपासूनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, या कारवाईमुळे अनधिकृत शैक्षणिक संस्थांवर मोठी धडक बसण्याची शक्यता असून, शिक्षण विभागाने पुढील तपासणी मोहीमही हाती घेण्याचे संकेत दिले आहेत.

