जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
पतंग बाजी हा संक्रांतीचा एक अविभाज्य घटक आहे. या दरम्यान पतंग उडविण्याच्या व कापण्याच्या जणू स्पर्धाच लागलेली असते. मात्र याकरीता बंदी असतांनाही नायलॉन मांजाचा वापर सर्रास केला जातो. यामुळे दरवर्षी शेकडो पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागतात. सोबतच कित्येक वाहनचालकांचा गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने गळा कापल्याने, अपघात घडून मृत्यू ओढावले आहेत, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकाराला आळा बसण्यासाठी आणि नायलॉन मंजाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी मानवधन संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा, नाशिक येथील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांच्या वतीने नायलॉन मांजाचा वापर हा सजीव सृष्टी साठी किती हानिकारक आहे, हे दर्शवणाऱ्या नाट्यकृतीचे आयोजन करण्यात आले आहे.
आज १० जानेवारी रोजी गामणे मळा येथे सकाळी ७:३० वाजता हा नाट्यप्रयोग सादर होणार असून याचा आस्वाद घेण्यासाठी आपली उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.