ओस्लो : रूढीवादी इराणमध्ये महिला अधिकार, लोकशाही व मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात प्रदीर्घ काळ संघर्ष करणाऱ्या व सध्या तुरुंगात कैद असलेल्या मानवाधिकारकार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना
यंदाचा प्रतिष्ठित शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना इराणमध्ये १३ वेळा अटक झाली. पाच वेळा त्यांना दोषी धरण्यात आले. एकूण ३१ वर्षे तुरुंगवास व यांना १५४ कोड्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तरीही त्यांनी शांततेचा ध्यास सोडला नाही. म्हणून त्या सर्वोच्च नोबेल पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. दरम्यान, येत्या १० डिसेंबर रोजी नोबेल पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी नर्गिस मोहम्मदी यांना सोडण्याचे आवाहन नोबेल समितीने शुक्रवारी केले आहे. नॉर्वे नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रीस अँडरसन यांनी राजधानी ओस्लो येथे नोबेल पुरस्काराची घोषणा केली. ते म्हणाले की, हा पुरस्कार इराणमधील निर्विवाद नेत्या नर्गिस मोहम्मदी यांच्या संपूर्ण चळवळीच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची ओळख आहे. आपल्या आंदोलनामुळे वारंवार अटक होणे व तुरुंगात जावे लागले तरीही त्यांनी स्वतःचे काम थांबवले नाही. या पुरस्कारामुळे नर्गिस यांना त्यांची वाटचाल अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा अँडरसन यांनी व्यक्त केली. २०१९ मध्ये इंधन दरवाढीविरुद्ध इराणमध्ये देशव्यापी निदर्शने झाली. यात २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीचा कोठडीत बळी गेला. तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला असता २०२१ मध्ये नर्गिस मोहम्मदी यांना अटक झाली होती. सध्या त्यांना राजधानी तेहराणच्या सर्वात कुप्रसिद्ध कारागृहात कैद केले आहे. या ठिकाणी पाश्चात्त्य देशांशी संपर्क ठेवणारे आरोपी व राजकीय कैद्यांना डांबण्यात आले आहे. मोहम्मदींना इराणमध्ये १३ वेळा अटक झाली. पाच वेळा त्यांना दोषी धरण्यात आले. एकूण ३१ वर्षे तुरुंगवास व १५४ कोड्यांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. तुरुंगात जाण्यापूर्वी नर्गिस मोहम्मदी इराणमधील प्रतिबंधित ‘डिफेंडर ऑफ ह्यूमन राइट्स सेंटर’ च्या उपाध्यक्षा होत्या. पेशाने अभियंता असलेल्या मोहम्मदी यांना २०१८ मध्ये एंद्रेई साखारोव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..
दरम्यान, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या नर्गिस मोहम्मदी १९ व्या महिला आहेत. या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या त्या दुसऱ्या इराणी महिला आहेत. यापूर्वी २००३ मध्ये शिरीन इबादी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेष विरोधी नेते नेल्सन मंडेला, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे माजी राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह आणि म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांनाही शांततेचा नोबेल मिळाला आहे. जवळपास १० लाख डॉलर्सचे रोख बक्षीस, १८ कॅरेटचे सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.