कोकाशाही विशेष लेख
आकड्यांनी सांगितले, देश पुढे चालला आहे. मनाने विचारले, मग मी का मागे राहिलो? उत्पन्नाचा तक्ता वर गेला, आणि समाधानाचा तक्ता कुठे हरवला? याविषयावर भाष्य करणारा हा लेख..
देशाची प्रगती मोजायची म्हटले की आपल्यासमोर येतात सकल देशांतर्गत उत्पादनाचे आकडे, शेअर बाजाराची उंची आणि उद्योगांची वाढ. हे आकडे महत्त्वाचे आहेतच, पण ते सगळे सांगत नाहीत. रस्ते चकचकीत झाले, इमारती उंच झाल्या, तरी माणसाच्या मनातील अस्वस्थता का वाढते आहे, याचे उत्तर आकड्यांत सापडत नाही.
एकटेपणाची वाढती साथ
आज शहरात शेजारी शेजाऱ्याला ओळखत नाही. एकाच इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांचा संवाद केवळ सणावारापुरता उरला आहे. पूर्वी गावात पारावर, चावडीवर, देवळाच्या पायरीवर माणसे रोज भेटत. सुखदुःखाच्या गप्पा होत. आता भ्रमणध्वनीच्या पडद्यावर शेकडो ओळखी आहेत, पण अडचणीच्या वेळी हाक मारावी असा एखादाच माणूस असतो. तरुण पिढीत मित्र कमी, चिंता जास्त आणि झोप कमी असे चित्र दिसते. कामाचे तास वाढले, पण कामातून मिळणारे समाधान घटले आहे.
जगाने दिलेली दिशा
या प्रश्नाचा विचार काही देशांनी गंभीरपणे केला आहे. भूतानने अनेक दशकांपूर्वी “सकल राष्ट्रीय आनंद” हे मापक स्वीकारले. तिथे धोरणे ठरवताना निसर्गाचे रक्षण, संस्कृतीचे जतन, लोकांचे आरोग्य आणि सुशासन यांचा विचार उत्पन्नाइतकाच केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आनंद अहवालात फिनलंडसारखे देश सातत्याने वरच्या क्रमांकावर असतात. त्यामागे त्यांची केवळ श्रीमंती नाही, तर लोकांचा परस्परांवरचा विश्वास, चांगले शिक्षण, आरोग्यसेवा आणि निसर्गाशी असलेले नाते ही कारणे सांगितली जातात. म्हणजे आनंद ही केवळ वैयक्तिक बाब नसून समाजाने घडवलेली गोष्ट आहे.
केन्स यांचा विचार
या चर्चेत जॉन मेनार्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. त्यांनी अर्थशास्त्राला केवळ नफ्यातोट्याच्या चौकटीत पाहिले नाही. माणसांतील जिव्हाळा, सौंदर्याचा आस्वाद आणि चांगल्या गोष्टींचा आनंद हेच जीवनाचे खरे मोल आहे, असे त्यांचे मत होते. पहिल्या महायुद्धानंतर पराभूत देशांवर लादलेला जबर आर्थिक बोजा पुढे मोठ्या अनर्थाला कारणीभूत ठरेल, असा इशारा त्यांनी दिला होता. नंतरच्या भीषण मंदीत त्यांनी सांगितले की, लोक अडचणीत असताना सरकारने हात आखडता न घेता खर्च करून अर्थव्यवस्थेला चालना द्यावी. त्यांच्या या विचारांनी दुसऱ्या महायुद्धानंतर कल्याणकारी राज्याच्या उभारणीला दिशा दिली. संकटे ही केवळ आपत्ती नसतात, तर नवी घडी बसवण्याची संधीही असतात, हा त्यांच्या दृष्टिकोनाचा गाभा होता.
कलेला पाठबळ
केन्स यांचे आणखी एक मोठे योगदान म्हणजे कलेला दिलेले राष्ट्रीय पाठबळ. युद्धाच्या काळातही त्यांनी कला आणि संस्कृती जपण्यासाठी संस्था उभारण्यात पुढाकार घेतला. कलावंत आपल्याला प्रेम करायला आणि आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवतो, म्हणून समाजाने त्याला आधार देणे हा खर्च नसून गुंतवणूक आहे, असे त्यांचे म्हणणे होते. आपल्याकडेही लोककला, नाट्य, संगीत आणि साहित्य यांना टिकवण्याची गरज याच दृष्टीने पाहायला हवी. तमाशा, भारूड, कीर्तन किंवा शाळेतील नाटक या गोष्टी समाजाला जोडणारे धागे आहेत.
कामाचा वेग आणि जगण्याची गती
आपल्याकडे आज “व्यस्त आहे” हे यशाचे लक्षण मानले जाते. सकाळी लवकर निघायचे, रात्री उशिरा परतायचे आणि मधला सगळा वेळ मोजमापांच्या शर्यतीत घालवायचा, अशी दिनचर्या अनेकांची झाली आहे. आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकायला, मुलांशी खेळायला किंवा आईच्या हातचे जेवण निवांत खायला वेळ उरत नाही. पण केन्स यांनी भाकीत केले होते की तंत्रज्ञानामुळे माणसाचे कष्ट कमी होतील आणि मोकळा वेळ वाढेल. तंत्रज्ञान वाढले, कष्ट कमी झाले नाहीत, उलट अपेक्षा वाढल्या. मोकळा वेळ मिळणे म्हणजे आळस नव्हे, तर माणूस म्हणून जगण्याची संधी आहे, हे आपण पुन्हा शिकले पाहिजे.
धोरणकर्त्यांसाठी काही मुद्दे
या सर्व विचारातून काही गोष्टी स्पष्ट होतात.
- प्रगती मोजताना केवळ उत्पन्न नव्हे, तर आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक नाती आणि निसर्ग यांचाही हिशोब ठेवावा.
- वाचनालये, मैदाने, उद्याने, सांस्कृतिक सभागृहे यांसारख्या सार्वजनिक जागांत गुंतवणूक करावी, कारण तिथेच माणसे एकमेकांना भेटतात.
- शाळांमध्ये गुणांइतकेच कला, खेळ आणि संवादकौशल्य यांना स्थान द्यावे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात केवळ उत्पादन वाढवण्याऐवजी माणसाला मिळणारा रिकामा वेळ अर्थपूर्ण कसा वापरता येईल, याचाही विचार व्हावा.
- संकटाच्या काळात खर्च कमी करण्यापेक्षा लोकांना आधार देणारी धोरणे राबवावीत.
शेवटी प्रश्न उरतो
अर्थव्यवस्था माणसासाठी असते, माणूस अर्थव्यवस्थेसाठी नसतो. आकडे वाढवण्याच्या शर्यतीत आपण जगण्याचा अर्थ गमावत नाही ना, हा प्रश्न व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून आपण स्वतःला विचारला पाहिजे. उत्तर मोठ्या घोषणांत नाही, तर लहान गोष्टींत आहे: शेजाऱ्याशी बोलणे, मित्राला भेटणे, एखादे गाणे ऐकणे, पुस्तक वाचणे. अशा गोष्टींना समाजाने आणि शासनाने जागा दिली, तरच चांगल्या जीवनाचा शोध सफल होईल.

लेखिका : प्राध्यापिका (अर्थशास्त्र)
मेल. drritashetiya14@gmai.com

