लोकशाही विशेष लेख
श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तब्बल ६७३ दिवसांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या हस्ते श्रीराममंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सकाळी अभिजित मुहूर्तावर माननीय पंतप्रधानांनी बटन दाबताच २ किलोचा धर्मध्वज हळूहळू वर जात १६१ फूट उंचीवर ध्वजस्तंभावर स्थिर झाला. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते अविस्मरणीय दृश्य भारतीयांसह समस्त जगभरातील श्रीरामभक्त पाहत होते. परमपवित्र श्रीरामजन्मभूमीत प्रभू श्रीरामांच्या मंदिरांचे बांधकाम अखेर पूर्ण झाले. भविष्यात भारताचा इतिहास जेव्हा केव्हा मांडला जाईल तेव्हा २२ जानेवारी २०२४ आणि २५ नोव्हेंबर २०२५ हे दोन दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील. येणारी पिढी आताच्या पिढीचे गोडवे गाईल कारण आजच्या पिढीला जे भाग्य लाभते आहे, ते मागील सहा-सात पिढ्यांच्या नशीबी नव्हते. आज आपण क्रांतिकारकांचे गोडवे गातो, कारण भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले, छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या, हसत हसत बलीवेदीवर चढले. त्यांच्या त्यागाचे चीज झाले. भारतभूमीला स्वातंत्र्य मिळाले. साऱ्या भारतभूमीचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामांचे त्यांच्याच जन्मभूमीत मंदिर उभारण्यासाठी ५०० वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला. या कालखंडात शेकडो रामभक्तांनी तीव्र संघर्ष केला, जुलमी आक्रमकांनी श्रीराममंदिर पाडून त्यावर उभारलेले बांधकाम पाडण्यासाठी कित्येक कारसेवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामध्ये कित्येकाचें पुत्र होते, कित्येकांचे भाऊ होते तर कित्येकांचे पती होते. या सर्वांनी आपल्या रक्ताच्या नात्यातील सदस्य श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यागला आहे.
श्रीराम सर्वार्थाने आदर्श होते. त्याकाळी जेव्हा राजे आणि राजपुत्र एकाहून अधिक विवाह करत त्याकाळीही श्रीरामांनी एकपत्नीव्रत आचरले होते. पत्नीच्या हरणानंतर वानरांचे संघटन करून त्यांनी बलाढ्य अशा रावणाचा वध केला आणि सीतामातेची सुटका केली. अश्वमेध यज्ञाच्या वेळी यजमान म्हणून विधी करण्यासाठी पत्नीची आवश्यकता असताना त्यांना दुसरी पत्नी करण्याचा सल्ला दिला गेला; मात्र श्रीरामप्रभूंनी सीतामातेची प्रतिकृती बनवून तिला शेजारी ठेवले आणि यज्ञविधी पूर्ण केले. पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचा आदर्श यानिमित्ताने त्यांनी जगासमोर ठेवला. आजमितीला समाजात अनैतिकता बोकाळलेली पाहायला मिळते. विवाहित असताना विवाहबाह्य संबंध ठेवले जातात. नात्याचा अडसर नको म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपचा करार करण्याचे पाश्चात्यांचे स्तोम याला न्यायालयीन मान्यता मिळाल्याने भारतातही मोठ्या प्रमाणात माजू लागले आहे. भारतीय संस्कृतीला न शोभणाऱ्या या फॅडमध्ये आता गुन्हेगारीचा शिरकाव होऊ लागला आहे. सहकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या छळाचे, फसवणुकीचे गुन्हे नोंद होऊ लागले आहेत. एकमेकांचे जीव घेतले जात आहेत. आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता घेतलेल्या निर्णयात फसवणूक झाल्याने काही मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. कित्येक मुलींचे जीवन यामध्ये उध्वस्त होत आहे. शारीरिक गरजा भागवण्यासाठी अनैतिकतेला कागदी कराराचे नैतिक लेबल लावून निर्माण झालेल्या संबंधांत नात्याचा गोडवा कुठून येणार ? नैतिकतेचा आदर्श प्रभू श्रीरामांनी आपल्यासमोर ठेवला आहे तो पुनर्जीवित करण्याचे दायित्व आजच्या पिढीवर आहे. वडिलांनीं सावत्र आईला दिलेल्या वचनाचा मान राखत प्रभू श्रीरामांनी १४ वर्षांचा वनवास पत्करला. एकीकडे राज्याभिषेकाची सिद्धता सुरु असताना अचानकपणे आलेला वनवास प्रभूंनी हसत हसत स्वीकारला. वनवासातून परतल्यानंतर कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता प्रभू श्रीरामांनी माता कैकयीचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. कुठे संपत्तीसाठी जन्मदात्या आईची हत्या करणारी आजची पिढी आणि कुठे वनवास देणाऱ्या सावत्र आईंशीही सख्ख्या आईच्या मायेने प्रेम करणारे प्रभू श्रीराम. रावणाचा वध केल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यास विभीषण तयार नव्हते, अशावेळी ‘मरणांती वैराणी’ या वचनानुसार प्रभू श्रीरामांनी बंधुत्वाच्या नात्याने रावणाचे अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. संकटकाळात सुग्रीव आणि विभीषणाला साहाय्य करून प्रभू श्रीरामांनी मित्रत्वाचा आदर्श जगासमोर ठेवला. प्रभू श्रीराम एकवचनी होते. मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सत्यच असायचा. वनवासात असताना श्रीरामांनी अनेक शापित जीवांचा उद्धार करून आपले अवतारत्व सिद्ध केले होते.
श्रीराम जन्मभूमीत श्रीराम विराजमान झाले. श्रीरामांच्या कृपेनेच मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन मंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण सुद्धा झाले. आता पुढील लक्ष्य हिंदुस्थानात रामराज्य पुनर्स्थापित करण्याचे असायला हवे. श्रीरामांना अपेक्षित रामराज्य आणण्याचे मोठे दायित्व यापुढे आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर असेल. भगवंताच्या कृपेने आणि श्रीरामभक्तांच्या प्रयत्नांनी ५०० वर्षांनंतर श्रीरामजन्मभूमीत राम मंदिर उभे राहिले, असेच प्रयत्न सुरु ठेवले तर रामराज्यही दूर नाही. रामराज्य म्हणजेच आदर्श राज्य. जिथे समस्त जीव गुण्यागोविंदाने नांदतील. जिथे सज्जनांचे रक्षण होईल आणि दुर्जनांचे निर्दालन केले जाईल. जिथे अनाचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार यांना स्थान नसेल. देशात रामराज्य आणायचे असेल तर सर्वप्रथम रामराज्याची स्थापना आपल्या मनात करावी लागणार आहे. त्यासाठी मनातील दोषांचे निवारण आणि गुणांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ या समर्थांच्या वचनानुसार सामाजिक स्तरावर कार्य करताना प्रत्येक वेळी भगवंताचे अधिष्ठान असणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रोहिडेश्वराला साक्षी ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. साक्षात आई भवानीचे त्यांना आशीर्वाद होते. समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकारामांसारख्या महान संतांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. महाराजांच्या मुखात सदैव जगदंब जगदंब हा जप असे. आई भवानीची कृपा आणि स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची साथ यांच्या बळावर शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. नामस्मरणाने मनाची शुद्धी होते, सत्संगाने नामस्मरणाला चालना मिळते. अंतर्बाह्य शुद्धी होऊन अंतःकरणात रामराज्य आले कि समाजात रामराज्य स्थापन होण्यास वेळ लागणार नाही. कधीकाळी असाध्य वाटणारे श्रीराम मंदिराचे ध्येय आज पूर्ण झाले. भारतभूमीमध्ये रामराज्याची पहाटही लवकरच पाहायला मिळावी यासाठी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करूया !