डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क
भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवात अनेक ठिकाणी पूजा सांगणाऱ्या गुरुजींची कमतरता जाणवते. ही गरज लक्षात घेऊन डोंबिवलीतील प्रसिद्ध गुरुजी व विविध मालिकांमध्ये गुरुजी म्हणून असणारे चंद्रकांत जोशी (नाना गुरुजी) व प्रसादगुरुजी जोशी यांनी देश-विदेशातील भाविकांसाठी ऑनलाइन गणेश स्थापना सांगण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:२५ वाजता नाना गुरुजी जोशी यांच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह शास्त्र गणेश स्थापना करण्यात येणार आहे. या माध्यमातून देश-विदेशातील भाविकांना घरबसल्या गणेश स्थापना करता येणार आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून एकात्मता, बंधुभाव आणि एकमेकांना मदत करण्याचा संदेश देणारा सण आहे. आपल्या धर्मशास्त्र व त्यातील व्रते, वैकल्ये ही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच आरोग्यासाठी पूरक असल्याचे सांगितले जाते. विविध ऋतूंमध्ये विशिष्ट पदार्थ वर्ज्य करण्याची तसेच योग्य आहार घेण्याची परंपरा विज्ञानही सांगते. ऋषी-मुनींनी सांगितलेल्या व्रत आचरणातून हे ज्ञान समाजापर्यंत पोहोचले आहे.
https://www.youtube.com/live/dpy031qodO0?si=XOdkwcNKIykliCzQ
सध्याच्या धकाधकीच्या युगात आणि सोशल मीडियाच्या काळात गणेशोत्सव अनेक देशांत पोहोचला आहे. मात्र, अनेकांना गणेशस्थापनेसाठी गुरुजी उपलब्ध होत नसतात. त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य वापर करून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जोशी बंधूंनी सांगितले. या संपूर्ण सोशल मीडिया नियोजनाची जबाबदारी रेणुकेश जोशी व व्यंकटेश जोशी सांभाळत आहेत. या माध्यमातून अनेक भाविकांना गुरुजींचे मार्गदर्शन मिळणार असून, हा उपक्रम काळाच्या गरजेनुसार आणि भक्तीभावासाठी उपयुक्त असल्याचे मानले जात आहे.

