उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते तर कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मध्य भारतामध्ये वाऱ्यांचा संगम होण्याची स्थिती निर्माण झाल्याने उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) ८ आणि ९ मार्चला गारपीट होण्याचा इशारा (Hail warning) हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत उर्वरित महाराष्ट्रात सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची इशाराही कायम ठेवण्यात आला आहे.

तसेच उत्तर भारत आणि हिमालयीन विभागामध्ये पश्चिमेकडून बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे हिमालयीन विभागात बर्फवृष्टी सुरू असून, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, चंडिगड, राजस्थान आदी भागात पाऊस आहे. या परिसरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असून, तेथून महाराष्ट्राच्या दिशेने बाष्प येत आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. याच वेळेला पूर्वेकडूनही वारे वाहत आहेत. मध्य भारतामध्ये या वाऱ्यांचा संगम होण्याची शक्यता असल्याने उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाडय़ात (Marathwada) काही भागांत ८ आणि ९ मार्चला सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. या विभागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. १० मार्चपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण राहणार आहे.

कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह ८ आणि ९ मार्चला पावसाची शक्यता आहे. मुंबई परिसरातही हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव आदी जिल्ह्यांत काही भागांत दोन दिवस गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांतही सोसाटय़ाचा वारा आणि विजांच्या कडकडाटात दोन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.