देशाच्या युवा शक्तीचा उपयोग भारताला बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी करता येऊ शकतो – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी
देशाच्या युवा शक्तीचा उपयोग भारताला बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी करता येऊ शकतो – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी
जळगाव जिल्हास्तरीय विकसित भारत युवा संसद स्पर्धा उत्साहात पार पडली
जळगाव : देशाच्या युवा शक्तीचा उपयोग भारताला बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी करता येऊ शकतो, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
युवक कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक संचालनालय, राष्ट्रीय सेवा योजना पुणे तसेच नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय “विकसित भारत युवा संसद स्पर्धे”चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला 21 मार्च रोजी प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कुलगुरूंनी भारताच्या विकासात युवकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले.
स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. प्रारंभिक भाषण राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. “एक देश, एक निवडणूक : विकसित भारतासाठी नवी पायवाट” या विषयावर विद्यार्थ्यांना तीन मिनिटांत संकल्पना मांडण्याची संधी देण्यात आली.
ही स्पर्धा भौतिकशास्त्र प्रशाळेत पार पडली. या स्पर्धेत धुळे, नंदुरबार आणि बुलढाणा जिल्ह्यांतील 60 पैकी 50 विद्यार्थ्यांनी आपली मते सादर केली. सूत्रसंचालन डॉ. मनोज इंगोले यांनी केले, तर व्यवस्थापन डॉ. संजय शिंगाणे, डॉ. विशाल देशमुख आणि डॉ. कविता पाटील यांनी पाहिले.
22 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यातील 61 विद्यार्थी आपली मते मांडणार आहेत. एकूण 232 अर्जांपैकी 121 विद्यार्थी अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले असून, यापैकी सर्वोत्तम 10 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे.