विद्यापीठ परिसरातील जंगलाला भीषण आग, वनकर्मचारी जखमी
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील हनुमान खोरे परिसरातील जंगलाला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत अनेक झाडे भस्मसात झाली असून, आग विझवताना एक वनकर्मचारी जखमी झाला आहे.
६ मार्च रोजी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या मागील हनुमान खोरे परिसरात जंगलाला आग लागली. ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. आगीत अनेक झाडे जळून खाक झाली असून, वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे.
आग विझवण्याच्या प्रयत्नात लखन मुरलीधर लोंकलकर (वय ३५, रा. एकलग्न, ता. धरणगाव) हा कंत्राटी वनकर्मचारी जखमी झाला. तो झाडावर चढून फांदी तोडत असताना आग अचानक वाढली आणि त्याच्या हाताला भाजल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या आगीचे नेमके कारण काय आहे, याचा शोध प्रशासन आणि वनविभाग घेत आहे. विद्यापीठ परिसरात जंगलाचा मोठा भाग असल्याने आग लागण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत, त्यामुळे वनविभागाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.