अविष्कार २०२५’ विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेला ३०–३१ डिसेंबरला प्रारंभ
५२८ संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग; ३३८ प्रवेशिका, ३०४ पोस्टर व ३४ मॉडेल्सचे सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दुसऱ्या टप्प्यातील विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार २०२५’ संशोधन स्पर्धेचे आयोजन दि. ३० व ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसह विद्यापीठ प्रशाळांमधून पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या ५२८ संशोधक विद्यार्थ्यांच्या ३३८ प्रवेशिकांची नोंदणी झाली असून, यामध्ये ३०४ पोस्टर व ३४ मॉडेल्सचे सादरीकरण होणार आहे.
दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रशांत बोकारे तसेच एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे सादरीकरण होणार असून सायंकाळी ५.१५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत मौखिक सादरीकरण होईल. त्यानंतर दुपारी ३.४५ वाजता समारोप व पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. समारोप कार्यक्रमास अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य अनिल राव उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती स्पर्धेचे सचिव डॉ. जयेंद्र लेकूरवाळे, समन्वयक डॉ. नविन दंडी व सहसमन्वयक डॉ. अमरदीप पाटील यांनी दिली.