मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगजेबाच्या कबरीच्या राज्यात सध्या घमासान सुरु आहे. या मुद्द्यावरून विधान करणाऱ्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून चांगलंच खडसावलं आहे, अशीही चर्चा आहे. यावर राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं नाव आहे, असं राणे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून पेटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे. ती कबर उखडून टाकण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून होत आहे. १७ मार्चला नागपूरमध्ये २ गटात झालेल्या तुफान राड्यानंतर राज्यातील वातावरण आणखी बिघडलं.
मुंबईत राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. त्यात नीतेश राणे यांच्यासह अनेक आमदार आणि नेते या मुद्द्यावर विधानं करत आहेत. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.
वादग्रस्त वक्तव्ये टाळली जावीत, यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस पुढे सरसावल्याचे समजते. फडणवीस यांनी नीतेश राणेंना कार्यालयात बोलावून तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, असे त्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीतेश राणेंना तंबी दिल्याचं वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झालं. त्यानंतर लागलीच नीतेश राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. मी त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे, असं ते म्हणाले. मी स्नेहभोजनाच्या निमंत्रणासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मला ते काहीही बोलले नाहीत. तुम्ही त्याची चिंता करू नका, असंही राणे म्हणाले.