लोकशाही न्यूज नेटवर्क
आरक्षणासाठी मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा बांधवांच्या या आक्रमक भूमिकेचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यालाही बसल्याचे पाहायला मिळाले. अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एसटी बसेस फोडल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये आले असून विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी वासाचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने अनेक गावात पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. शिर्डी येथील सभेसाठी लोकांना घेऊन जाण्यासाठी मंगरूळ येथे गेलेल्या एसटी बस (क्र. एम. १४, बीटी २१५८)च्या अज्ञातांनी काचा फोडल्या. यामुळे ही बस चालक पी. पी. फुंदे यांनी पुन्हा शेवगाव आगारात पुन्हा आणली.
सध्या बसचा पंचनामा करण्याचे काम सुरु असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, मराठा बांधवांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. त्यामुळेच लोकांना शिर्डी येथे घेवून जाण्यासाठी गेलेल्या बसेसही अनेक गावातून रिकाम्या परतत असल्याचे चित्र आहे.
मोदी गो बॅकच्या दिल्या घोषणा….
दरम्यान, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या काळ्याफिती लावून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. गो बॅक…गो बॅक..मोदी गो बॅक अशा घोषणा देखील देण्यात आल्या.