लोकशाही संपादकीय लेख
सध्या वनातील बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वनातून गाव शिवारात आणि शेती शिवारात वावर वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकऱ्यांच्या साखळी शिवारातील शेतात बिबट्याने दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका सात वर्षीय मुलाला आई जवळ असताना त्याच्यावर हल्ला करून त्याच्या पोटाचे लचके तोडले. त्यानंतर मुलगा मृतावस्थेत सोडून बिबट्या पसार झाला. त्या आदिवासी कुटुंबाचा मुलगा गेल्याने त्यांच्यावर संकट कोसळले. हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात उचलले गेले. मृत मुलाच्या कुटुंबीयांना शासनातर्फे दहा लाखाची मदत जाहीर करण्यात आली. त्या आदिवासी कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले.
मात्र १० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील निंभोरा शिवारातील एका मक्याच्या शेतात बिबट्याचा मृतावस्थेत आढळला. गेल्या सहा-सात महिन्यांपासून वडगाव तालुक्यातील बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी होत्या. त्या परिसरातील अनेकांनी पाहिलेले होते. तसेच एका ठिकाणी म्हशीच्या पारडूवर हल्ला केल्याची घटना देखील घडली होती. बिबट्याच्या मादीने जन्म दिलेली पिल्ले अनेकांना दिसली होती. एकंदरीत गेल्या सहा सात महिन्यापासून भडगाव तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. अशात १० मार्च रोजी संध्याकाळी निंभोरा शिवारातील एका शेतकऱ्याच्या मकाच्या पिकात उग्र वास येत असल्याने शेतकऱ्याकडून मका पिकाची पाहणी केली. तेव्हा मक्याच्या शेतात मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. त्यांनी तातडीने सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांना पाचारण केले आणि मृत बिबट्या दाखवला.
सायंकाळी तातडीने वनविभाग वन खात्याच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना पाचरण करून मृतावस्थेतील बिबट्या त्यांना दाखवून बिबट्याचा मृतदेह वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला. त्यानंतर भडगाव कजगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याची पाहणी करून त्याचे पोस्टमार्टम करून पोस्टमार्टम अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. पोस्टमार्टमचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्यामुळे त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे सांगता येणार नाही. तरी प्रथमदर्शनी पाहता त्याच्या नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण घातपाताने मृत्यू झाला असता तर मृत बिबट्याचे काही अवशेष काढले गेले असते. तसेच बिबट्याला बंदुकीने मारले गेले असते तर त्याच्या अंगावर जखमा आढळून आल्या असत्या. तशी कुठलीही जखमृत बिबट्याच्या अंगावर दिसत नसल्याने त्याचा घातपात आणि मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही, असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोस्टमार्टम नंतर सदर बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आला आहे. परंतु वनातील हिंसक प्राण्याचा गावशिवारात झालेल्या मृत्यूमुळे तसेच गावातील गाव शिवारातील बिबट्याचा वावर वाढत असल्याने वन खात्यावर मोठी जबाबदारी येत आहे.
जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील साखळी शिवारात बिबट्याचा सात वर्षाचा मुलावर झालेला हल्ला आणि आता भडगाव तालुक्यातील निंभोरा शिवारात आढळलेला मृतदेह या दोन गोष्टी लागोपाठ घडल्याने जळगाव जिल्ह्यातील गावकऱ्यांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरणे सहाजिक आहे. त्यामुळे वनखात्याची जबाबदारी वाढली आहे. वनाचा ऱ्हास होत असल्यामुळे वनातील हे हिंस्र प्राणी आपला मोर्चा गावाकडे वळवित आहे. वनांचा ऱ्हास रोखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच हे हिंस्र प्राणी वनातून गावाकडे येणार नाही याची जबाबदारी वन खात्याने घेणे गरजेचे आहे. जर हे हिंस्र प्राणी गाव शिवारात आलेच तर त्यांच्यापासून संरक्षण कसे करता येईल? याचे गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना वन खात्याने प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
वनांबरोबरच वन्य प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच त्यांचे जतन करण्यासाठी वन खात्याने आपले कसब पणाला लावण्याची गरज आहे. अलीकडे महाराष्ट्रात वन्य प्राणी वनातून गाव शिवारांकडे येण्याची संख्या वाढली आहे. ते अधिक वाढणार नाहीत याची काळजी घेणे, त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी वन खात्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच हिंस्र वन्य प्राण्यांपासून संरक्षण देण्यासाठी विशेष मोहीम आखण्याची गरज आहे. आज बिबट्याने एका बालकावर हल्ला केला, तो पळून गेला. निंभोरा शिवारातील मक्याच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला या बाबींची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा ‘अशा घटना होतच असतात’ म्हणून त्याकडे कान डोळा केला, तर त्याची गंभीर परिणाम भोगावे लागतील. या संदर्भात वन खात्याने जनजागृती करण्याची आवश्यकता आहे…!