लोकशाही न्यूज नेटवर्क

संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पावसाच्या सरींनी निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस सर्वत्र पावसाचा जोर कायम राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, कोकण तसेच राज्यातील विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD च्या अंदाजानुसार, कोकण विभागात पावसाचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्येही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.
दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अनेक भागांत पेरणीसाठी योग्य वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे विविध साथीचे आजार वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेऊन आरोग्याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यभर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने येत्या काही दिवसांत आणखी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


