अमेरिकेच्या दबावाला न जुमानता मोदी–पुतीन भेट
संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रात महत्त्वाचे करार होण्याची शक्यता
नवी दिल्ली (प्रतिनिधी) युक्रेन युद्धावरून अमेरिकेसह पाश्चात्य देशांकडून वाढत असलेल्या दबावाकडे दुर्लक्ष करत भारत–रशिया संबंधांना नव्या गती देण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन गुरुवारी भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून होत असलेला हा दोन दिवसांचा दौरा उभय देशांमधील कूटनीतिक नात्यास नवी दिशा देणारा ठरणार असून संरक्षण, ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रात मोठे करार होण्याची शक्यता बोलली जात आहे.
रशियाचे राष्ट्रपती २३व्या भारत–रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी दिल्लीत आले असून, परिषदेत संरक्षण सहकार्य मजबुत करणे, द्विपक्षीय व्यापार बाह्य दबावापासून सुरक्षित ठेवणे आणि ‘लहान मॉड्यूलर अणू रिऍक्टर’ या क्षेत्रातील संभाव्य सहयोगावर भर देण्यात येणार आहे. अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत असल्याने संपूर्ण पाश्चात्य जगाचे लक्ष या भेटीकडे आहे.
या परिषदेत युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठीच्या प्रयत्नांवरही चर्चा अपेक्षित आहे. पुतीन हे अमेरिकेसोबत नुकत्याच सुरू झालेल्या नवीन चर्चांबाबत मोदींना माहिती देऊ शकतात, अशी स्रोतांची माहिती. युक्रेन संघर्षाचा तोडगा संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातूनच काढावा, ही भारताची भूमिका सातत्याने ठाम आहे.
मोदी–पुतीन बैठक संपल्यानंतर उभय देशांमध्ये संरक्षण, ऊर्जा व व्यापार क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. विशेषत: भारतीय कामगारांना रशियात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा करार यावेळी अंतिम होऊ शकतो. रशियातील वाढत्या मनुष्यबळाच्या टंचाईत हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.
याशिवाय औषध, कृषी, खाद्य उत्पादन तसेच इतर वस्तूंच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ अपेक्षित असून, भारत–रशिया आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.