दोन दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा मेहरुण तलावात मृतदेह; क्यूआर कोडवरून पटली ओळख

0

दोन दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा मेहरुण तलावात मृतदेह; क्यूआर कोडवरून पटली ओळख

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील शिरसोली रोड परिसरातील संतोष वामन नेरपगार (वय ५९) हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. रविवारी सकाळी मेहरुण तलावात पाण्यावर तरंगत असलेला एक मृतदेह आढळून आला असून, पोलिसांनी खिशात सापडलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून मयताची ओळख पटवली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नेरपगार हे टेलरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरातील कुणालाही न सांगता बाहेर पडले होते. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीही माहिती मिळाली नाही.

रविवारी सकाळी मेहरुण तलावात एका नागरिकाला पाण्यावर तरंगणारा मृतदेह दिसल्याने पोलिसांना कळविण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. सुरुवातीला ओळख पटत नसल्याने पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता, खिशात युपीआय पेमेंटचा क्यूआर कोड आढळला.

पोलिसांनी त्या क्यूआर कोडची माहिती तपासून संबंधित दुकानदाराशी संपर्क साधला असता, तो कोड संतोष नेरपगार यांनी पेमेंटसाठी घेतला होता, असे समोर आले. त्यावरून पोलिसांनी मयताची ओळख निश्चित केली.

यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी करून नेरपगार यांना मृत घोषित केले. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.