लग्न समारंभात चोरी; नवरदेवाच्या आईच्या पर्समधून सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील लग्न समारंभ आता चोरट्यांच्या रडारवर आले असून, अशाच एका विवाह सोहळ्यात नवरदेवाच्या आईच्या पर्समधून सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बन्सीलाल पॅलेस येथे घडला. या प्रकरणी अमळनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबेपुरा येथील हनुमान मंदिराजवळ राहणारे प्रल्हाद भावसार व लता भावसार यांच्या तुषार भावसार यांचा विवाह बन्सीलाल पॅलेसमध्ये संपन्न झाला. लग्न सोहळ्यात लता भावसार यांनी आपल्या सुनेसाठी घेतलेले २३.६८० ग्रॅम सोन्याची पोत (१,८६,७६४ रुपये) आणि ४.३०० ग्रॅम पेंडल (३३,९१४ रुपये), असे एकूण २,२०,६७८ रुपयांचे दागिने पर्समध्ये ठेवले होते.
विवाहाच्या पारंपरिक विधीप्रमाणे जेष्ठ नातेवाईकांचे पाय पडण्यासाठी लता भावसार काही क्षण बाजूला गेल्या असता, चोरट्याने संधी साधत पर्स उघडून दागिने लंपास केले. परत आल्यानंतर त्यांना पर्स उघडी दिसली आणि दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
लता भावसार यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत. या घटनेमुळे लग्न समारंभातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.