पाचोरा : गाळण बुद्रूक (ता. पाचोरा) येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सुवर्णा पाटील असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. भवरखेडा (ता. धरणगाव) येथील सुवर्णाचा विवाह गाळण (ता. पाचोरा) येथील योगेश पाटील यांच्याशी गेल्या फेब्रुवारी महिन्यात झाला होता. योगेश नाशिकला कंपनीत नोकरीस असून योगेशचा मोठा भाऊ मोहन नाशिक येथे रुग्णालयात उपचार घेत असल्याने योगेश तेथेच असून मयत सुवर्णाची सासू बाहेरगावी व सासरे पाचोरा येथे गेले असताना घरात सुवर्णा व तिची नणंद या दोघीच होत्या. सुवर्णाने घरातील छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे वृत्त सुवर्णाच्या माहेरी कळवल्यानंतर माहेरच्या मंडळीने लगबगीने गाळण गाठले व त्यांनी सुवर्णाची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. लग्नातील सात लाख रुपये हुंड्यापैकी पाच लाख रुपये दिले. उर्वरित २ लाखांसाठी सुवर्णाचा छळ केला जात होता. तिने वेळोवेळी माहेरच्यांना याबाबत सांगितले होते. तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासाअंती दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
मृतदेह घेण्यास नकार : मयत सुवर्णाच्या नातलगांनी सुवर्णा पाटीलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सासरच्यांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणी सुवर्णाच्या माहेरच्यांनी केली.