नवीन MIDC जागेची निश्चिती १५ जूनपर्यंत होणार -जिल्हाधिकारी अमन मित्तल

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर अंतर्गत उद्योगमंत्री ना.उदय सामंत  यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी जळगाव जिल्हा विकास परिषद घेण्यात आली.

या परिषदेत जिल्ह्यातील औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या. या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने औद्योगिक व व्यापारी संघटनांचे विविध मागण्यांबाबत आढावा बैठक घेण्याचे निश्चित होऊन त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ४ वाजता आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या परिषद संयोजक सौ संगीता पाटील, MIDC चे प्रादेशिक अधिकारी -अनिल गावित, MIDC चे कार्यकारी अभियंता -धीरज बारापात्रे, जळगांव MIDC चे क्षेत्र व्यवस्थापक -वासुदेव सपकाळे, सहाय्यक आयुक्त वस्तू व सेवा कर विभागाचे -एस. एन. बोबडे, जळगाव महावितरण चे सहाय्यक विद्युत निरीक्षक -उल्हास नाईक, जळगाव विमान प्राधिकरणाचे संचालक – रोझी रवींद्रन, जळगाव मनपा अग्निशमन विभागाचे अधिकारी, जळगाव ईएसआईसी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील उपस्थित होते.

सदरील बैठकीत नवीन औद्योगिक वसाहत, ESIC हॉस्पिटल, वीज दर, दुहेरी कर आकारणी, फायर स्टेशन, लेबर सेस, माथाडी कामगार या विषयावर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित जळगाव जिल्हा विकास परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यात उद्योग, व्यापार व पायाभूत सुविधांसह अनेक प्रलंबित प्रश्नांना चालना मिळाली. परिषदेच्या निमित्ताने मांडल्या गेलेल्या विषयांवर विविध स्तरावर कार्यवाही सरू असल्याचे जळगाव जिल्हा विकास परिषदेच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी अधोरेखित केले. बैठकीत संगीता पाटील यांनी नवीन औद्योगिक वसाहतीबाबत मुद्दा मांडला असता, कुसुंबा शिवारात भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू असून नवीन MIDC जागेची निश्चिती १५ जूनपर्यंत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिली.

तसेच ESIC हॉस्पिटल बाबत शासनाकडून जागा उपलब्ध करून देणे बाबत जिल्हाधिकारी जळगाव यांनी संमती दिलेली असून १५ जून पर्यंत जागेची पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव एमआयडीसी मध्ये फायर स्टेशनची उभारणी करणे बाबत मऔवि महामंडळ मुंबई यांनी सदर अग्निशमन केंद्र हे जळगाव महापालिकेला हस्तांतरित केले असून या संदर्भात मऔवि महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

तसेच भडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एक्सप्रेस फिडर प्रमाणे वीजदर आकारणी केली जाते परंतु एक्सप्रेस फिडर मधून वीज दिली जात नाही, असा मुद्दा उपस्थित केला असता, जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्याला भडगाव औद्योगिक वसाहतीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.

माथाडी कामगारांचा कायदा लागू न करण्याबाबत येत्या ८ जून रोजी बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. तसेच जळगाव शहरातील रस्ते, फ्लायओव्हर संदर्भातील सर्व कामे दोन महिन्यात पूर्ण होतील असे बैठकीत आश्वासित केले. नवं उद्योजकांसाठी ८ जून रोजी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.

सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने मांडल्या गेलेल्या विविध विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सदर बैठकीला जळगांव जिल्हा विकास परिषदेच्या चेअरपर्सन तथा गव्हर्निंग कौन्सिल मेंबर संगीता पाटील यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिल मेंबर नितीन इंगळे, दिलीप गांधी, महेंद्र रायसोनी, किरण बच्छाव व लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष प्रमोद संचेती, विनोद बियाणी, भारत पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, सुयोग जैन, संदीप भोळे, सुयोग जैन, संजय जैन, अरविंद दहाड आदी सदस्य तसेच उद्योजक व्यापारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.