लाडक्या बहिणी अन् दीदींना केंद्राकडून मिळेल ओवाळणी !
नारीशक्तीला मिळणार बळ : अर्थमंत्री तिजोरी उघडणार
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही वर्षांपासून महिला निवडणुकीच्या केंद्रस्थानी आल्याचे पाहायला मिळत असून भाजपने थेट महिलांना लाभ देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. लाडक्या बहिणींनी भरभरून महायुती सरकारला प्रेम दिले आणि मोठ्या बहुमताने सत्तेवर आणले. त्यामुळे आता 2025-26 या आर्थिक वर्षांचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यासोबतच मोदी सरकार महिला सक्षमीकरणावर आपले लक्ष केंद्रित करणार असून लाडक्या दीदींसाठी नवी योजना येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महिलांच्या निर्णायक मतदानाने स्पष्ट केले आहे की महिलांना सक्षम बनवणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय पातळीवरही दूरगामी परिणाम होतो. 2019 ते 2024 या दरम्यान महिला-केंद्रित योजनांना अभूतपूर्व यश मिळाले आहे. साक्षरता कार्यक्रमांमुळे 4.5 दशलक्ष महिला मतदारांची भर पडली तर, मुद्रा योजनेसारख्या रोजगार योजनेचा 3.6 दशलक्ष महिलांना लाभ झाला आहे. त्याचवेळी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घराची मालकी नोंदणी केल्याने 20 लाख अतिरिक्त मतदारांची भर पडली. त्याचप्रमाणे, स्वच्छता आणि आरोग्य उपक्रमांचा महिलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीनंतर सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली होती. मिशन शक्ती, कामगार महिला वसतिगृहे आणि कौशल्य विकास कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले तर, काम करणाऱ्या मातांसाठी पाळणाघर सुविधा, महिला उद्योजकतेसाठी आर्थिक योजना आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने महिलांना कामाच्या ठिकाणी सहभागी होण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते.
योजनांची व्याप्ती वाढविणार !
आगामी अर्थसंकल्पात महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे अपेक्षित असून डिजिटल साक्षरता, स्टार्टअप्समध्ये सहभाग आणि उद्योग-विशिष्ट कौशल्य विकास कार्यक्रमांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, आरोग्य योजना आणि स्वच्छता कार्यक्रमांचा विस्तारही होऊ शकतो तर, ग्रामीण महिलांसाठी उज्ज्वला योजना आणि जनधन योजना, लखपती दीदी यासारख्या विशेष योजनांची व्याप्ती वाढवली जाऊ शकते.