भयंकर.. चार मुलींसह बापाची विष प्राशन करून आत्महत्या
शेजाऱ्यांना घरातून आली दुर्गंधी.. धक्कादायक कारण उघडकीस
दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
देशाची राजधानी दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील रंगपुरी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली आहे. शुक्रवारी शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील पाच जणांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. वसंत कुंच येथील रंगपुरी गावात ही घटना घडली आहे. वडीलांनी चार मुलींसह विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. फ्लॅटचे कुलूप तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला आले आहेत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि नमुने गोळा करून तपासासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवालानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितले.
दरम्यान शुक्रवारी स्थानिक रहिवाशांना घरात दुर्गंधी जाणवू लागल्यावर शेजाऱ्यांनी फोन करून पोलिसांना माहिती दिली. अनेक दिवसांपासून कुटुंबातील एकही सदस्य दिसत नसल्याचे स्थानिक रहिवाश्यांनी सांगितले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला असता एका खोलीत चारही मुलींचे मृतदेह आढळून आला, तर दुसऱ्या खोलीत वडील हिरालाल यांचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलिसांनी हिरालाल यांचा मोठा भाऊ जोगिंदर यांना घटनेची माहिती दिली . या कुटुंबाने सल्फासच्या गोळ्या प्राशन करून आत्महत्या केल्याचं पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांना येथून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. आपल्या मुलींच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या वडिलांनी आपल्या कुटुंबासह स्वतःला संपवल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारही मुली अपंग होत्या आणि त्या चालण्यासही असमर्थ होत्या. आपल्या मुलींची अवस्था पाहून वडील हिरालाल हे खचून गेले होते. त्यांच्या पत्नीचे याआधीच निधन झाले आहे. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलेल्या वडिलांनी मुलींना विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केलीची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरालाल (50) हे रंगपुरी गावात भाड्याच्या घरात राहत होते, ते मूळचे बिहारच्या छपरा जिल्ह्यातील मसरख गावचा रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नीचे आधीच निधन झाले होते. त्यांना नीतू (18), निशी (15), नीरू (10), निधी (8) या चार मुली होत्या.
वडील हिरालाल स्वतः दररोज त्यांच्या मुलींची काळजी घेत होते. सकाळी आपल्या मुलींना खाऊ घालणे आणि साफसफाई करून ते कामावर जायचे आणि परत आल्यावर मुलींचा सांभाळा करायचे. आपल्या मुलींची ही अवस्था पाहून वडील खचून गेले होते. त्यामुळेच त्याने आपल्या मुलींसह आत्महत्या केल्याचं स्थानिक रहिवाश्यांनी सांगितलं आहे.