गुरूग्राम, लोकशाही न्यूज नेटवर्क;
हरियाणाच्या गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आठवड्याच्या बाळाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, एका आठवड्याच्या बाळाचा गळा चिरून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गुरुग्राममधील दरबारीपूर रोडवर फेकून दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबरला सकाळी एका स्वच्छता कर्मचाऱ्याने रक्ताने माखलेले बाळ पाहिले. करौली, राजस्थान येथील सफाई कर्मचारी राजेश यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तत्काळ आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली मात्र कोणताही सुगावा लागला नाही.
पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितले?
मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले की, बाळाचे वय एका आठवड्यापेक्षा जास्त नाही आणि तो निरोगी होता. पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक आता या प्रकरणाचा तपास करत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणाहून एक किलोमीटरच्या परिघात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पण त्यांना ठोस काहीही मिळाले नाही. पोलिस आता रस्त्यावरील विक्रेते आणि इतर लोकांची मुलाची आणि मारेकऱ्याची ओळख पटवण्यासाठी चौकशी करत आहेत.

