आकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान किती महत्वाचे आहे ते सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नको. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी भारताला उभारण्यासाठी केलेले कार्य शब्दात मावेनसे आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा मूल्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या दोन नेत्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पिढीने पुढे चालविला असून आता या दोन्ही नेत्यांचे पणतू भारत जोडो यात्रेत एकत्र येणार असल्याने जणू इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतू काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू केलेली भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. १७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा आकोल्यातील बाग फाटा येथे मुक्कामी असेल तेथेच महात्मा गांधींचे पणतू प्रख्यात गांधीवादी विचारवंत तुषार गांधी हे राहुल गांधी यांची भेट घेऊन दुसऱ्यादिवशी त्यांच्यासोबत शेगावपर्यंत पदयात्रा करणार आहेत. गांधी-नेहरूंच्या या दोन्ही पणतूंची भेट भारत जोडो यात्रेमधील महत्त्वाचा क्षण असून या निमित्ताने लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्यांना आणखी बळ मिळेल, अशी भावना काँग्रेसच्या समर्थकांमध्ये व्यक्त केली जात आहे.