लोकशाही न्यूज नेटवर्क

नीट परीक्षा 2026 संदर्भात मोठी घडामोड समोर आली असून, पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट 2026) रद्द करण्यात आली आहे. 3 मे रोजी देशभरात पार पडलेल्या या परीक्षेनंतर पेपर लीक झाल्याचे आरोप समोर आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) चौकशी सोपवण्यात आली असून, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, 8 मे रोजी या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडे तपास सोपवण्यात आला होता. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर सध्याची परीक्षा प्रक्रिया पुढे सुरू ठेवणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी हा कठीण निर्णय घेण्यात आल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे आरोप समोर आले होते. काही संशयित प्रकरणे उघड झाल्यानंतर सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. कथित पेपरफुटी नेटवर्कची व्याप्ती, त्यामागील आरोपी आणि पेपर कशा प्रकारे लीक झाला, याचा सखोल तपास केला जाणार आहे.
या निर्णयामुळे जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र, नव्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. केंद्र सरकारने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले असून, तपासासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे आणि नोंदी सीबीआयला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एनटीएने म्हटले आहे.


