महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा
देवकर–पवारांवर नाराजी
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणांतच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये तीव्र अंतर्गत कलह उफाळून आला असून पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तिकीट वाटपावरून गुलाबराव देवकर आणि संजय पवार यांच्याविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सर्वच पक्षांत हालचालींना वेग आला असतानाच अजित पवार गटातील अस्वस्थता उघडपणे पुढे आली आहे. महायुतीतील जागावाटपात आपल्या गटाला डावलले जात असल्याची भावना आधीपासूनच पक्षात होती. भाजप आणि शिवसेनेने कमी जागा देण्याची भूमिका घेतल्याने नाराजी वाढली होती. याच पार्श्वभूमीवर परवा रात्रीपासून गुलाबराव देवकर यांनी सूत्रे हातात घेत महायुतीबाबत चर्चा सुरू केली होती; मात्र त्यातून ठोस तोडगा निघाला नव्हता.
दरम्यान, तिकीट वाटपावरून अभिषेक पाटील यांचा देवकर आणि संजय पवार यांच्याशी तीव्र वाद झाल्याची चर्चा असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे थेट राजीनामा पाठवला आहे. पत्रकारांनी संपर्क साधला असता पाटील यांनी राजीनाम्याला दुजोरा दिला; मात्र सध्या यावर अधिक भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राजीनाम्याच्या नेमक्या कारणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातील संघर्ष पुन्हा एकदा उघड झाल्याचे चित्र दिसत आहे.