NCB कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

एनसीबीचे  मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एकूणच महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत. दिवसेंदिवस ते वानखेडेंवर आरोप करत आहेत. मलिकांच्या या आरोपांना वानखेडेंही जोरदार उत्तर देत आहेत. आता समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान  मैदानात उतरली आहे. आज एनसीबीच्या मुंबई कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

समीर वानखेडेंवर एकापाठोपाठ एक आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही आता आंदोलने होऊ लागली आहेत. आज बुधवारी सकाळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेतर्फे समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, नेमक्या त्याचवेळी कार्यालयात दाखल होणाऱ्या समीर वानखेडेंवर पुष्पवृष्टी करत त्यांना छत्रपती शिवरयांची एक प्रतिमा भेट देण्यात आली. समीर वानखेडेंनी या सर्व गोष्टींचा स्विकार केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. वानखेडेंचा सत्कार केल्यानंतर या संघटनेचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, “आमची वानखेडेंकडे मागणी आहे की तुम्ही कुठल्याही आरोपांकडे लक्ष न देता कारवाई करत राहा. तुम्ही जी कारवाई केली आहे ती अगदी योग्य आहे. ड्रग्जच्या रॅकेटचा तुम्ही पर्दाफाश करा. आमच्या संघटनेतर्फे आम्ही पूर्ण राज्यभरातून त्यांना समर्थन देत आहोत. आर्यन शाहरुख खानला वाचवण्यासाठी समीर वानखेडेंवर रोज नवनवे आरोप करणाऱ्या नवाब मलिकांचा आम्ही निषेध करत आहोत आणि देशातला, राज्यातला युवक वानखेडेंसोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत”. यावेळी या कार्यकर्त्यांनी ‘समीर वानखेडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी उपस्थितांनी ‘ड्रग्ज का दुश्मन समीर वानखेडे’ असे पोस्टर्सही सोबत आणले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here