लोकशाही न्यूज नेटवर्क

लोणावळा येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या लायन्स पॉईंट परिसरात आज एक दुर्दैवी घटना घडली. भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी येथे कार्यरत असलेले कर्मचारी राकेश कुमार मिश्रा (वय ५०) यांचा सुमारे २५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश मिश्रा हे आज लायन्स पॉईंट परिसरात गेले होते. दरम्यान, अचानक तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले. परिसरातील नागरिकांनी आणि पर्यटकांनी तत्काळ याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळताच आयएनएस शिवाजीचे पथक, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, मावळ आपत्ती व्यवस्थापन टीम तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकांनी अत्यंत धाडसाने आणि शिताफीने दोरांच्या सहाय्याने २५० फूट खोल दरीत उतरून शोधमोहीम सुरू ठेवली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर राकेश मिश्रा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा अपघाती मृत्यू असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
दरम्यान, लायन्स पॉईंट हे लोणावळ्यातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. मात्र अनेकदा पर्यटक सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करत धोकादायक ठिकाणी फोटो काढण्यासाठी किंवा फिरण्यासाठी जातात. त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळांवर खबरदारी घेणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.


