अखेर बँकांचा संप मागे !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून (All India Bank Employees Association) आजपासून सुरु होणारा देशव्यापी बँक संप (Nationwide Bank Strike) मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं आज देशभरातील बॅंका सुरु राहणार आहेत.

कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बॅंक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाकडून होकार देण्यात आला आहे. मुख्य कामगार आयुक्तां (केंद्र) सोबत बॅंक संघटनांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

आऊटसोर्सिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बॅंकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही. सोबतच बॅंकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीनं करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा बॅंकिंग संघटनांचा आरोप होता. काही बॅंकांचे कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या वादावर देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांनी पुढाकार दाखवला आहे. या चर्चेनंतर अखेर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून आजपासून पुकारण्यात आलेला संप मागे घेतला आहे.

केंद्र सरकारने IBA आणि बँक युनियनला 16 नोव्हेंबर रोजी चर्चा सुरु करुन संप टाळण्यासाठी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीत सीएलसी रामिस थिरु यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सलोखा बैठकीत हे निर्देश देण्यात आले होते. परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने उद्या बँकांचा देशव्यापी संप होणार असल्याचं संघटनेनं सांगितलं होतं. त्यानंतर काल पुन्हा या मागण्यांबाबत चर्चा झाली आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने संप मागे घेण्याची घोषणा केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.