लोकशाही संपादकीय लेख

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळा आज थाटात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथील कोथळी येथे पार पडला. हा अमृत महोत्सवी सोहळा राजकीय नव्हता; परंतु अशा कार्यक्रमाला भाजपसह महायुतीच्या जळगाव जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी जणू बहिष्कारच टाकला. जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह स्थानिक भाजपचे, शिवसेनेच्या आमदारांची अनुपस्थिती खटकत होती. ते या कार्यक्रमाला का आले नाहीत, हे कळले नाही; पण त्यांची अनुपस्थिती हा एक चर्चेचा विषय बनला होता. खासदार स्मिता वाघ यांनीसुद्धा उपस्थिती दिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार याही अनुपस्थित होत्या. या सर्वांनी कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण स्वीकारले होते, तरीही ते आले नाहीत. स्थानिक महायुतीचे सर्व आमदार हे जाणीवपूर्वक आले नाहीत का, असा संशय सर्वच आमदारांच्या अनुपस्थितीवरून जाणवतो. परंतु या कार्यक्रमाला जयंत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, शेकापचे जयंत पाटील, रासपचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर, मनसेचे नेते बाविस्कर आदींसह अनेक नेते उपस्थित होते.
या अमृत महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रास्ताविकानंतर मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर काही नेत्यांच्या मनोगतानंतर एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त त्यांना शरद पवार यांच्या हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर एकनाथराव खडसे यांचे भाषण झाले. खडसे यांच्या संपूर्ण भाषणात कुठेही राजकारणाचा लवलेशही नव्हता. गेल्या ७४ वर्षांतील त्यांच्या जीवनपटाचा थोडक्यात उलगडा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आताच्या राजकारणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात काम करण्याची मजा काही औरच होती. २००० ते २०१४ पर्यंत या कालावधीत काँग्रेसचे राज्य होते; पण विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षाची मोट बांधणीने पक्षाचा पाया मजबूत झाला. कैलासवासी उत्तमराव पाटील, कैलासवासी नासर फरांदे, अण्णा डांगे असे कितीतरी नेते घेता येतील, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्याच काळात चंद्रकांत मेंडकी आणि डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या संपर्कात आल्याने आरएसएसच्या १९८३ च्या पुणे शिबिरात भाग घेण्याची मला संधी मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. भाजप महाराष्ट्रात समजला; पण ऐन माझ्या पडत्या काळात शरद पवार यांनी मला जो आश्रय दिला, जे आशीर्वाद दिले, ते मी कधीही विसरू शकणार नाही. मी शरद पवारांचा फार पूर्वीपासून फॅन होतो. त्यांची १९८० साली कापूस भावाच्या वाढीसंदर्भात नागपूरला दिंडी निघाली होती. त्या दिंडीत सहभागी झालो होतो. माजी मंत्री व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे मला जे मार्गदर्शन लाभले, ते मी कदापि विसरू शकणार नाही, असे आपल्या भाषणात एकनाथराव खडसे यांनी सांगितले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
एदलाबादचे मुक्ताईनगर असे नामकरण माझ्याच कारकिर्दीत झाले. परंतु त्या मुक्ताईनगरच्या मुक्ताई देवस्थानाविषयी मी मुख्यमंत्र्यांकडे शंभर कोटींचा मसुदा दिला होता; परंतु त्यांनी त्यातील फक्त २५ कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी नऊ कोटी रुपये नऊ वर्षांपूर्वी मंजूर केले. त्यानंतर बाकीची रक्कम मिळालेलीच नाही. देवस्थान सुधारण्यामध्ये अशा प्रकारची स्थगिती येते, हे अशोभनीय आहे. नऊ कोटी रुपयांच्या खर्चानंतर बाकीची रक्कम ही मिळालीच नाही. त्यामुळे आमच्या मुक्ताईनगरचे मंदिर पूर्णतेचे काम अपूर्ण राहिले आहे. देवाधिदेवांच्या कामात अशी स्थगिती देणे हे योग्य नाही. मला त्याचे फार वाईट वाटले. कार्यक्रमाला कोणी आले, कोणी आले नाही, हे चालत राहणार. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर स्थानिक नेत्यांची नावे घेतात; अनुपस्थितीबद्दल त्यांनी चकार शब्दही काढला नाही. आज वयाची ७४ वर्षे पूर्ण करून मी ७५व्या वर्षात पदार्पण करत आहे. ७४ वर्षांचा काळ तसा फार मोठा आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा आमदार झालो होतो. तेव्हा मला अर्ध्या मतदारसंघातील लोकांनी चहा सुद्धा पाजत नव्हते; परंतु पुढे ४० वर्षे मी या मतदारसंघाशी कसा एकरूप झालो, हे मला कळलेच नाही. मुक्ताईनगर मतदारसंघातील जनतेने मला खूप प्रेम दिले. त्या प्रेमाचा मी ऋणी आहे. त्यांचे मी आभार मानतो, असे खडसे यांनी शेवटी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
दोन सप्टेंबर २०२६ हा त्यांचा वाढदिवस; पण रविवारचा दिवस ३० ऑगस्ट सगळ्यांना कार्यक्रमाला यायला सोपे व्हावे म्हणून रविवार हा दिवस नाथाभाऊंनी निवडला होता. त्याआधी २६ ऑगस्टपासून भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आणि तो भागवत सप्ताह दोन सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. भव्य अशा मंडपात हा भागवत सप्ताह सुरू आहे. तेथे नामवंत कीर्तनकारांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होत आहे. म्हणजे भागवत सप्ताहाच्या निमित्ताने या परिसरातील जनतेला एक वेगळीच पर्वणी मिळाली आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही, असा खुलासा त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनी करून खडसे कुटुंबाच्या वतीने आयोजित राजकीय अमृत महोत्सवाविषयी आम्हाला फार आनंद होतो आहे.
एकंदरीत प्रमुख म्हणून, एक वडील म्हणून आम्हाला घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने खडसे कुटुंबीय विविध बाबी पादाक्रांत करीत आहेत. त्यामुळे एकनाथराव खडसे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आम्हाला फार आनंद होतो आहे, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. त्यामुळे राजकारणविरहित असलेला हा अमृत महोत्सवी सोहळा मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे. सामाजिक परिवर्तन अथवा अध्यात्माचा दुहेरी संगम या अमृत महोत्सवी सोहळ्याने सध्या केला आहे. आगामी वर्षभर अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अशाच अमृत महोत्सवी सोहळ्याला महायुतीचे स्थानिक नेते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे काय संदेश समाजात गेला आहे, हे त्यांनीच आजमावावे. नाथाभाऊंच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देताना त्यांना दीर्घायुष्य लाभो, जीवन निरोगी व आरोग्यपूर्ण होवो, त्यांच्या जीवनात चैतन्य लाभो, याच शुभेच्छा आम्ही यानिमित्त व्यक्त करतो.


