नाशिक; बसला आग, एका मुलासह 11 जणांचा होरपळून मृत्यू…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नाशिकमध्ये आज पहाटे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लक्झरी बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका मुलाचा समावेश आहे. या अपघातात इतर 38 प्रवासी भाजले असून, सर्व जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की ते अद्याप मृतांचा नेमका आकडा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा अपघात औरंगाबाद रोडवर नाशिकमधील नांदूर नाका मिर्ची हॉटेलजवळ पहाटे पाचच्या सुमारास घडला. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरला धडकल्याने बसला आग लागली. बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती, तर कंटेनर ट्रक नाशिकहून पुण्याकडे जात होता.

घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.प्रवासी बस आगीचा गोळा बनून धुराच्या लोटात जळत होती.

नाशिकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे म्हणाले, “मृतांपैकी बहुतांश बसमधील स्लीपर कोचमधील प्रवासी होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.” याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पहाटे ५.१५ च्या सुमारास हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे, त्यानंतर त्यांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिका बोलावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.