नशिराबादमध्ये पिकअप वाहन चोरी
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील जुनी नगर परिषद परिसरातून एका भाजीपाला विक्रेत्याचे मालवाहू पिकअप वाहन चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (२ डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत बुधवारी दुपारी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद दत्तात्रय चौधरी (वय ४४, रा. नशिराबाद) हे कुटुंबासह राहून भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. भाजीपाला मार्केटमध्ये ने-आण करण्यासाठी त्यांच्याकडे एमएच १९ बीएम ५६२२ क्रमांकाचे मालवाहू पिकअप वाहन आहे. दररोजप्रमाणे २ डिसेंबर रोजीही त्यांनी हे वाहन जुने नगर पंचायत परिसरात पार्किंगला लावले होते.
दरम्यान, सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हे वाहन चोरून नेले. संध्याकाळी सातच्या सुमारास चोरीची घटना उघड होताच चौधरी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ कमालकर बागुल हे करीत आहेत.