अरे वाह.. नाशिकचा कुंभमेळा यंदा २८ महिने

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नुकताच प्रयागराज येथील कुंभमेळा संपला. त्यानंतर आता  श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणारा कुंभमेळा हा साधारणत: तेरा महिने कालावधीचा असतो. मात्र, यंदा तब्बल ७१ वर्षांनी अभूतपूर्व योग येणार आहे. तो म्हणजे गुरू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तो दोन वेळा वक्री होणार आहे आणि त्यानंतर तो नियमित भ्रमण करून पुढील राशीत २४ जुलै २०२८ रोजी प्रवेश करणार आहे. त्यामुळे यंदाचा कुंभमेळा तब्बल २८ महिने चालणार आहे.

यापूर्वी १९५६ साली कुंभमेळ्याच्या वेळी अशाप्रकारचा योग आला होता. त्यानंतर यंदा २०२६-२७ मध्ये कुंभमेळा भरल्यानंतर असा योग येणार असल्याची माहिती नाशिकच्या श्री पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली.

कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तीन पर्वणी असतात आणि त्या दिवशी साधू-महंतांचे शाहीस्नान असते. त्याच वेळी देशभरातून येऊन भाविक स्नान करतात. यंदा या तीन पर्वण्यांशिवाय २८ महिन्यांत ४० ते ४१ अमृत पर्व काळ स्नानाचे मुहूर्त असणार आहेत. पर्वकाळात श्रावण अमावस्या, ऋषिपंचमी, वामन एकादशी या साधारणत: तीन तारखा शाही स्नानासाठी असतात. यासंदर्भात सर्वानुमते अधिकृतरीत्या तारखा घोषित होतील.

सतीश शुक्ल, अध्यक्ष,  श्रीगंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ, नाशिक यांनी सांगितले, गुरूने सिंह राशीत प्रवेश केला की, कुंभमेळा सुरू होतो. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:०२ मिनिटांनी गुरूचा सिंह राशीत प्रवेश होईल. धर्मध्वजारोहणाने कुंभपर्वाला प्रारंभ होईल.

मात्र, यंदा वर्षभराने म्हणजे १३ महिन्यांनी गुरू बदल होऊन कुंभपर्व संपणार नाही, कारण २०२८ पर्यंत दोन वेळा गुरू वक्री होईल. त्यानंतर २४ जुलै २०२८ रोजी दुपारी ३:३६ वाजता तो पुढील राशीत मार्गस्थ होईल. त्यामुळे त्या दिवशी ध्वजावतरण अर्थात कुंभपर्वाची ध्वजा उतरवली जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.