मन की बात

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ गेल्या वर्षभरापासून नाराज होते. आता त्यांना मंत्रीपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. छगन भुजबळांच्या एंट्रीने वादाचीच शक्यता अधिक असल्याचेही तितकेच खरे आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला ? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मंत्री माणिकराव कोकाटे, दादा भुसे, गिरीश महाजन हे रांगेत असतांना आता छगन भुजबळ यांचे आगमन झाल्याने वादाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे पाहिले तर भुजबळ हे आक्रमक नेते म्हणून परिचित आहेत. कुणी अंगावर आले तर त्याला शिंगावर घेण्याची त्यांची तयारी असते. आक्रमक स्वभाव असल्यामुळे अनेक वेळा त्यांना पदावर ‘पाणी’ सोडावे लागले. 1960च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द भुजबळ यांनी सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे. 1973 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. 1973 ते 1984 या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. 1985 मध्ये महापौर झाले. 1991 मध्ये बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळे झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. त्यांचा हा राजकीय प्रवास वाटतो तेवढा सोपा देखील नाही. स्वपक्षीयांवर देखील त्यांनी अनेक वेळा तोंडसुख घेतलेले आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा सहभाग असल्याने भुजबळ यांना मंत्री करतील अशी शक्यता होती. मात्र त्यावेळी त्यांना ‘नारळ’ देण्यात आले होते. मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळांनी आगपाखड करीत टीकेची झोड उठविली होती. सध्या नाशिक पालकमंत्रीपदाची नियुक्ती स्थगित करण्यात आली आहे. दादा भुसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांची निवड करण्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात विरोध आणि निदर्शने झाल्यामुळे राज्य सरकारने नियुक्ती स्थगित केली. नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालकमंत्रीपद स्थानिक आमदाराला द्यावे अशी शिवसैनिकांची मागणी असल्याने गिरीश महाजन यांची नियुक्ती थांबविण्यात आली.
पालकमंत्रीपदावरुन महायुतीतच नाराजी नाट्य रंगल्याने विरोधकांनी त्यावर ताशेरे ओढले. आगामी काळात नाशिक येथे होवू घातलेल्या कुंभमेळ्यामुळे आपल्याच पक्षाला पालकमंत्रीपद मिळावे हा हेका भाजपा आणि शिवसेनेत आहे. त्यात आता छगन भुजबळांना मंत्रीपद मिळाल्याने वादाची फोडणी मिळाली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असतांनाही पालकमंत्रीपदासाठी भाजपा- शिवसेनेतच रस्सीखेच सुरु असल्याने या वादात आता राष्ट्रवादी उडी घेण्याची शक्यता बळावली आहे. छगन भुजबळांना पुढे करुन उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकचे पालकमंत्रीपद पदरात पाडून घेण्याच्या तयारी असल्याची देखील चर्चा असल्याने पालकमंत्रीपदाच्या वादाला आता खऱ्या अर्थाने भुज‘बळ’ मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हे एक प्रकारे आव्हान असून ते यातून कसा मार्ग काढतील हे आगामी काळात स्पष्ट होणार असले तरी महायुतीत ‘कुस्त्या’ होणार हे मात्र तितकेच सत्य आहे.

वरिष्ठ उपसंपादक
9960210311

