धक्कादायक… कोट्यवधींच्या संपत्तीसाठी मृतदेहाला जिवंत भासवले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 नाशिक:  मधील कोट्यवधींच्या संपत्तीसाठी मृतदेहाला जिवंत भासवले .मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५) यांचा पंडित कॉलनीतील त्यांच्याच गोपाळ पार्कमधील इमारतीत राहणारा व्यावसायिक राहुल गौतम जगताप याने दोन महिन्यांपूर्वी हत्या केली.

एकाकी जीवन जगणाऱ्या कापडणीस पिता-पुत्रांचा गैरफायदा घेत त्यांची कोट्यवधींची संपत्ती हडपण्यासाठी राहुलने थंड डोक्याने दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे संशयित राहुल याने कापडणीस यांच्या मोबाइलचा स्वत: वापर करत त्यांना दोन महिने आभासी जिवंत ठेवले होते

मोबाइलचा सुरू होता वापर

कापडणीस यांच्या शेअर्सच्या डिमट अकाउंटवरून शेअर्स खरेदी-विक्री करणे असो किंवा बँकेचे व्यवहार तसेच त्यांच्या बंगल्याच्या बांधकामाकरिता विविध बांधकाम साहित्य पुरविणाऱ्यांसोबत संपर्क करण्याकरिता संशयित राहुल हा त्यांच्या माेबाइलचा वापर करत होता.

यामुळे नानासाहेब कापडणीस जिवंतच आहे, असेच सर्वांना वाटत होते; मात्र त्यांचा गळा आवळून खून करत मृतदेह मोखाड्याच्या घाटात दोन महिन्यांपूर्वीच संशयिताने फेकून जाळून टाकला होता.

मुदत ठेवींची रक्कमही करणार होता वर्ग

नानासाहेब कापडणीस यांच्या बँकेतील मुदत ठेवींपैकी ज्यांची मुदत पूर्ण झाली, अशा १५ ते २० लाखांची रक्कमही संशयित राहुल हा स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करण्याच्या तयारीत होता. कापडणीस यांची ३० लाखांची मुदत ठेव ही मुदतपूर्व असून, त्याचा कालावधी कधी संपणार, याची माहितीही त्याने करून घेतली होती.

हत्याकांडात वापरलेली कार शोधली

हत्याकांडात आरोपी राहुल गौतम जगताप याने वापरलेली मारुती स्विफ्ट कार पोलिसांनी गुरुवारी शोधून काढली. या कारचा विभागीय न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने ऑन द स्पॉट पंचनामा करत धागेदोरे जुळविण्याचा प्रयत्नही केला. जगताप याच्या घरी संध्याकाळी पोलिसांच्या तपास पथकाने धडक दिली. त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करत घराची झडती घेतली.

बंगल्याचे काम थांबायला नको

गंगापूर पोलीस ठाण्याच्या मागे सावरकरनगर भागात कापडणीस यांच्या तीनमजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. हे काम थांबायला नको, यासाठी संशयित राहुल याने त्यांच्या शेअर्स विक्रीतून मिळविलेल्या ९७ लाखांच्या रकमेतून संबंधित बांधकाम साहित्य पुरविणाऱ्यांना पैसे देत पुन्हा बंगल्याचे बांधकाम पूर्ववत सुरू ठेवले होते.

२५ लाखांची रेंजरोव्हर

राहुलने शेअर्स विक्रीतून मिळालेल्या रकमेतून सुमारे २५ ते ३० लाखांत रेंजरोव्हर कार खरेदी केली होती. या कारचा मालक त्याने त्याच्या भावाला कागदोपत्री दाखविले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.