नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकमधील उत्तमनगरमध्ये सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात भीषण स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचे नुकसान झाले. घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या काचा त्याचप्रमाणे आजूबाजूच्या घरांच्या काचाही फुटल्या. या स्फोटामुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली.
हा स्फोट घरात वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंटमुळे झाल्याची प्रथमदर्शनी मिळाली आहे. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास सुरु आहे. सिडको भागातील उत्तमनगर परिसरात राहणाऱ्या गांगुर्डे यांच्या घरात ही भीषण स्फोटाची (Mobile Blast) घटना घडली आहे. घराच्या काचांसह आजूबाजूला असलेल्या वाहनांच्या काचा देखील फुटल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
नाशिक मधील उत्तमनगर परिसरात तुळजा निवास या घरात गांगुर्डे कुटुंबीय राहते. आज सकाळी घरात मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. याच मोबाईलच्या बाजूला डिओड्रंट आणि काही कॉस्मेटिक ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोबाईलच्या उष्णतेने डिओड्रंटचा मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर स्फोट इतका गंभीर होता की, त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली, काचा फुटल्या. तसेच शेजारच्या घराच्या काचा फुटल्या असून समोरच्या भागातील दोन गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान घरात दोन मोबाईल जळालेल्या अवस्थेत आहेत, मात्र चार्जिंग सॉकेट जळालेले नाहीत. परफ्युमच्या बॉटल आणि इतर काही साहित्य घराबाहेर फेकलं गेलं आहेत, पण त्यांना आगीचा फटका बसलेला नाही. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सिलेंडरचा स्फोट झाल्यासारखा आवाज झाल्याने आम्ही घाबरलो आणि घराबाहेर पळत सुटलो, घरात आग लागल्याने आम्ही पाणी टाकून ती विझवली. पोलिसांचा तपास सुरु असून या तपासानंतरच स्फोटाचे नेमके कारण समोर येणार आहे. तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार असे जखमी झालेल्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे.