नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
घोटी – काळुस्ते मार्गावर शेणवड बंधाऱ्यालगतच्या विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
घोटीजवळील कांचनगाव परिसरात शेणवड बु. शिवारातील डॅमचे पाणी सोडण्याच्या आउटलेट जवळील विहिरीत दोन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळले. मनीषा भाऊ पारधी (वय 19) व सरिता काळू भगत (वय 18, दोघीही रा. ठाकूरवाडी, कांचनगाव) असे मृतदेह आढळलेल्या मुलींची नावे आहेत. घोटीचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय कौटे, हवालदार केशव बस्ते, भाऊसाहेब बिन्नर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. स्थानिक नागरिक व युवकांच्या मदतीने हे दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून घोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
या दोन्ही मुली चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यात एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी 1 फेब्रुवारी रोजी घोटी पोलिस ठाण्यात केली होती. पालक नातलग व परिसरात मुलींचा शोध घेत होते. घोटी पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर व तपासाअंती त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.