नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ध्रुव राजपूत (वय ५) असं या चिमुकल्याचे नाव असून चारचाकी वाहनाच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव आपल्या वडिलांसोबत हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून परतत असताना हा भीषण अपघात झाला. हॉटेलच्या प्रांगणात ग्रे रंगाची कार प्रवेश करत असताना ध्रुव अचानक पळत गाडीसमोर गेला. वाहनचालकाला वेळेत काही कळण्यापूर्वीच गाडीचे चाक थेट ध्रुवच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर ध्रुवला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी अवस्थेमुळे डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर ध्रुवच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि मित्र परिवार हळहळ व्यक्त करत आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून चालकाची चौकशी सुरू आहे. तसेच दोषी चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.