शस्त्राचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीचा छडा

0

नाशिक : महामार्गावर धारदार शस्त्राचा धाक दाखवित वाहनधारकांना लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह नऊ मोबाइल असा सुमारे ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सराईत असलेल्या या टोळीचा म्होरक्या सध्या कारागृहात आहे. मात्र, त्याचाही पोलीस ताबा घेणार असून, त्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ लुकमान पठाण उर्फ गफूर बस्ती (वय ३०, रा. घर नं. ३८८२, नानावली, मानूर रोड) व प्रवीण उर्फ चाफा निंबाजी काळे (वय २४, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, उपनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, त्यांचा मोहम्मद अन्वर सय्यद (रा. स्वामी समर्थ हौ. सोसा. नानावली,प्रज्ञानगर) हा साथीदार अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या कारागृहात आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात १ जानेवारी रोजी मध्यरात्री किरण कावळे (रा. दिवा इस्ट, ठाणे) व त्यांचा मित्र होंडा सिटी कार रस्त्याच्या कडेला पार्क करून विश्रांती घेत असताना ही घटना घडली होती. दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने धारदार कोयत्याने कारची पुढील काच फोडून दोघा मित्रांना शस्त्राचा धाक दाखवित लुटले होते. या घटनेत त्रिकुटाने दोघा मित्रांच्या ताब्यातील सोनसाखळी, रोकड व मोबाइल बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर दि. १३ जानेवारी रोजी रात्रीही पुन्हा याच परिसरात लूटमार झाली होती. याबाबत नवीनकुमार जैन (रा. दादर, मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. टाटा हॅरिअर कारची काच फोडून अज्ञात त्रिकुटाने रोकडसह मोबाइल असा ८२ हजारांचा ऐवज लांबविला होता. लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आल्याने ग्रामीण पोलिसांची यंत्रणा कामालालागली होती. अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणेनिहाय गुन्ह्यांचा आढाव घेत जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील नानावली व उपनगर परिसरात सापळा लावला असताना दोघे संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांनी कारागृहात असलेल्या मोहम्मद सय्यद या साथीदाराच्या मदतीने घोटी व वाडीव-हे परिसरात लूटमार केल्याची कबुली दिली आहे. संशयितांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचे नऊ मोबाइल असा सुमारे ९७ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तिघे संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर जबरीचोरी, चोरी, दुखापत, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे असून, मोहम्मद सय्यद याचा लवकरच पोलीस कारागृहातून ताब्यात घेणार आहेत.

या पथकाने केली कारवाई
ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर व अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, हवालदार नवनाथ सानप, पोलीस नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, मनोज सानप, भूषण रानडे आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.