यशस्वी जीवनासाठी चतुःसूत्रीचा अवलंब करा : निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर

0

लोकशाही न्यूज 

नाशिक

सुरगाणा; तालुक्यातील मोहपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याशी ‘शाळा, पुस्तकापलीकडील जीवनशिक्षण’ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संवाद साधला. यावेळी कार्यक्रम संयोजक शिक्षक नामदेव वाजे यांनी स्वागत केले तर विद्यार्थिनी भाग्यश्री गायकवाड हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच अतिथी परिचय करून दिला.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे बालपण, शिक्षण, छंद, आवड, पोलीस क्षेत्रात येण्याची प्रेरणा, सेवा काळातील काही प्रसंग याविषयी प्रश्न विचारत संवाद साधला. यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अतिशय मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनातील विविध प्रसंगाच्या दाखल्यांसह मार्गदर्शन केले.

नाशिक येथील विविध आठवणी सांगताना नाशिकला महिला अधिकारी म्हणून दिलेला आदर व सन्मानपूर्वक वागणुकीचा  विशेष उल्लेख त्यांनी केला तसेच काही काळ सुरगाणा येथेही पती बोरवणकर यांच्या सोबत वास्तव्य केले असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील लोकांचे साधे राहणीमान, उच्च विचारसरणी असल्याचा उल्लेख त्यांनी मुलाखतीदरम्यान केला.

याशिवाय पोलीस विभाग असेल किंवा कोणतेही प्रशासन असेल त्यातील भ्रष्टाचार किंवा प्रामाणिकपणावर बोलताना त्या म्हणाल्या, की ” याला समाजातील नागरिकांचा सहभाग जबाबदार आहे.नागरिक प्रशासनात सहभागी होत नाही. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेप वाढला आहे. नागरिक बघ्याची भूमिका घेतात. नागरिकांनी प्रशासनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.”

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात वाचनाचे महत्त्व  नमूद केले. माणसाचे वाचन करणे गरजेचे आहे. सुशिक्षित माणूस वाचनाशिवाय आशिक्षितच असतो, असे त्या म्हणाल्या.  जीवनात सेहत, संयम, संतुलन आणि संकल्प या चतुःसूत्रीचा अवलंब केल्यास जीवन नक्कीच यशस्वी होते. या चतुःसूत्रीचा यशस्वी जीवनासाठी अवलंब करण्याचे  विशेष आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक नवनाथ ठाकरे, दीपक अहिरे, निलेश बुवा, कैलास चौधरी यांनीही संवाद साधला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गौळी यांनी मनोगत व्यक्त करत मीरा बोरवणकर यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.