नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात तोडगा निघू शकला नसल्याने आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
तसे पहिले तर नाशिकला कांदा प्रश्न नवीन नाही. गेल्या काही महिन्यात सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची (Onion Farmers) अनेक आंदोलन पहायला मिळाली. सुरुवातीला केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. आता कुठे कांदा लिलाव सुरु झाले होते, तोच आता कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आजपासून कांडा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. तसेच कांद्याचे निर्यातमूल्य वाढल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली असून, नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. कांदा उद्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट बघायला मिळत आहे.
दरम्यान यापूर्वीच कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट बघायला मिळत आहे. अनेक दिवस आंदोलने सुरु होती. त्यातच व्यापारी वर्गाचेही नुकसान होत असल्याने नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने (Onion Traders Association) आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेण्यात आल्या होत्या मात्र, व्यापारी वर्गाने निवेदनात मांडलेल्या मागण्यांवर बैठकीत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह 17 कृषी उत्पन्न बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असून एका दिवसात साधारणतः 30 ते 40 कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याची माहिती आहे.