जिल्हा यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन अद्ययावत व सज्ज ठेवा – राधाकृष्ण गमे

0

विभागाची मान्सुन-२०२३ पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न

नाशिक;- पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात मान्सुन-२०२३ पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी धुळे जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक आशिमा मित्तल, अहमदनगर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, नंदूरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपायुक्त (महसूल) संजय काटकर, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, मान्सूनच्या काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारणासाठी नियोजन करुन सज्ज रहावे. तसेच प्रत्येक विभागाने २४X७ नियंत्रण कक्षाची स्थापना करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव साहित्य पोहोच करणे आणि ते साहित्य चालुस्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्पुरत्या निवारा स्थळांची निश्चिती करण्याच्या सूचना, विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पूरपरिस्थितीत वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे. तसेच सर्व पुलांचे निरीक्षण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सुस्थितीबाबत खात्री करावी. यासोबतच दरडी कोसळणे, वीज पडणे, झाडे रस्त्यावर पडून वाहतुक बंद होणे यावर संबंधित विभागाने व्यवस्था करावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपतग्रस्तभागातील नागरिकांना अन्न धान्य, पिण्याचे पाणी, निवारा, कपडे आदी आवश्यक वस्तुंचा पुरवठा करुन पुरात घरे वाहून गेलेल्या निरश्रितांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. महसूल विभागाने मदत व पुनर्वसन आणि पंचनामे करण्यासाठी स्वंतत्र पथकाची नेमणूक करण्यात यावी.

मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना देवून विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, रस्ते दुरुस्ती, धोका दायक इमारती, दूषित पाण्याच्या तक्रारी, अखंडित वीज पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन पावसाळ्यात साथीचे रोग पसरु नये तसेच संपर्क माध्यमे अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत गरज भासल्यास लगतच्या जिल्ह्यांची मदत घेण्यासाठी नियोजन करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.