लग्नाला बारा दिवस बाकी अन्‌ एका हल्ल्याने सारेच संपले !

मारहाणीत तरुणाचा अंत : नंदुरबारात घडली घटना

0

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लग्नाला अवघे बारा दिवस बाकी असलेल्या तरुणासोबत भयंकर घटना घडली असून यात तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतत आहे. तरुण रेल्वेने गावी जात असताना जागेच्या वादातून जमावाने त्याच्यासह आणखी एकावर चाकू हल्ला केला. त्यात या 27 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेतील हल्लेखोरांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वातावरण तापले होते.

चेन्नई जोधपूर एक्सप्रेस प्रवास करीत असताना जागेवर बसण्याच्या वादातून सुमेरसिंग जबरसिंग राजपूत (वय 27) व पर्वतसिंग डोंगरसिंग राजपूत (वय 40) या दोघांवर दहा ते पंधरा जणांनी हल्ला केला. हल्ल्यात दोन्ही प्रवाशांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. दोघेही जखमी प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी सुमेरसिंग जबरसिंग राजपूत रा.गुडियाला, जिल्हा जोधपुर, राजस्थान या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. युवकाचा 20 फेब्रुवारीला विवाह होणार होता. विवाह आधीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जोपर्यंत आरोपींना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा देखील नातेवाईकांनी घेतला आहे. नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

 

जागेवरून वाद अन्‌ बळी

चेन्नई जोधपूर एक्सप्रेसच्या जनरल बोगीत बसण्याच्या वादातून राजस्थानच्या दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दि. 2 फेब्रुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन चढलेल्या एका प्रवाशासोबत बाचाबाची नंतर त्यांने फोनवरुन आपले काही साथीदार नंदुरबार रेल्वे स्टेशनवर बोलावत राजस्थानाच्या दोन प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्लांनतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी नंदुरबार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्धा ते पाऊण तासाच्या खोळंब्यानंतर चेन्नई जोधपूर एक्सप्रेस जोधपूरकडे रवाना करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.